मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये संस्थात्मक गुंतवणुकीत थेट चौपट वाढ झाली आहे. तब्बल १.१९ अब्ज डॉलर्सवर ही गुंतवणूक पोहोचली आहे. एका अहवालाने ही संबंधित माहिती प्रकाशित केली. अहवाल कुशमन अँड वेकफिल्डच्या मतानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये संस्थात्मक गुंतवणुकीत थेट चौपट वाढ झाली असून ती १.१९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. परकीय गुंतवणूकदारांना निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांना चांगल्या परताव्यासाठी निधी देण्याची इच्छा असल्याने हे घडले असे अहवालाने आपल्या निरिक्षणात म्हटले.
तसेच रिअल इस्टेट कन्सल्टंट कुशमन अँड वेकफिल्डच्या इंडिया कॅपिटल मार्केट्सच्या २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या अहवालात स्पष्ट केल्याप्रमाणे या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत मुंबईत संस्थात्मक गुंतवणूक १,१९५.७८ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीत २९५.५७ दशलक्ष डॉलर्स होती.
मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटमधील एकूण गुंतवणुकीपैकी अहवालातील माहितीनुसार,परदेशी भांडवलाचा वाटा दोन तृतीयांश (६७%) म्हणजे ७९७.७ दशलक्ष डॉलर्स होता ज्यामध्ये अमेरिकेतील गुंतवणूकदार (५०० दशलक्ष डॉलर्स) आणि जपानमधील गुंतवणूकदार (२९७ दशलक्ष डॉलर्स) होते. उर्वरित ३९८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे योगदान देशांतर्गत गुंतवणूकदारांनी दिले असल्याचे अहवालाने म्हटले.
याविषयी आपले मत व्यक्त करताना व प्रसारमाध्यमांशी बोलताना कॅपिटल मार्केट्सचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक सोमी थॉमस यांनी म्हटले आहे की,'मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेतील संस्थात्मक गुंतवणूक सलग चौथ्या वर्षी १ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. 'ही लवचिकता मजबूत मूलभूत तत्त्वे, पायाभूत सुविधांवर आधारित वाढ आणि वैविध्यपूर्ण मालमत्ता आधार दर्शवते जी परदेशी आणि देशांतर्गत भांडवलाला आकर्षित करत आहे. ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड सारख्या परिवर्तनकारी प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी वाढल्याने, मुंबईच्या दीर्घकालीन वाढीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की पुढील महिन्यांत ही गती वाढेल' असे ते पुढे म्हणाले.
कुशमन अँड वेकफिल्डच्या अहवालात असे दिसून आले आहे की जानेवारी-सप्टेंबर २०२५ मध्ये संपूर्ण भारतातील गुंतवणूक निधीचा ओघ १०% घसरून ४६९४.५४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर आला आहे, जो मागील वर्षाच्या याच कालावधीत इयर ऑन इयर बेसिसवर ५२३६.२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होता. अधिकृत माहितीनुसार या कॅलेंडर वर्षात भारतीय रिअल इस्टेटमध्ये एकूण संस्थात्मक गुंतवणूक ६-६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स असा अंदाज लावला आहे, जो २०२४ मध्ये ७.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता.