मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता इच्छुकांची भाऊगर्दी आणि महायुती व महाविकास आघाडीत जागा वाटपाला जोर येणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतील माहिम विधानसभा क्षेत्र हे उबाठा आणि मनसे युतीचा प्रमुख केंद्र ठरणार आहे. या मतदार संघात पाच प्रभाग असून मनसेकडून तीन प्रभागांची मागणी होणार आहे. तीन खुल्या प्रवर्गासाठी मनसेची जोरदार मागणी असून उबाठा आता मनसेला या जागा सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.
मुंबईतील माहिम विधानसभा क्षेत्रात नगरसेवकांचे पाच प्रभाग येत असून यामध्ये सध्या भाजपाचा एकमेव नगरसेवक असून उर्वरीत चार प्रभागांमध्ये शिवसेना आणि उबाठाचे प्राबल्य आहे. यामध्ये प्रभाग १८२(ओबीसी), प्रभाग १९० (खुला प्रवर्ग), प्रभाग १९१(ओबीसी महिला), प्रभाग १९२ (खुला प्रवर्ग), प्रभाग १९४ (खुला) असे आरक्षण पडले आहे. या निवडणुकीत उबाठा मनसे यांची युती असल्याने यामध्ये यातील प्रभाग क्रमांक १९०, १९२ आणि १९४ प्रभागांवर मनसेचा दावा असेल तर उबाठाच्या वाट्याला प्रभाग क्रमांक १८२ आणि प्रभाग क्रमांक १९१ येवू शकतील असा अंदाज आहे. मनसेची तीन प्रभागांची मागणी मान्य न झाल्यास प्रभाग क्रमांक १९० आणि १९२ वर मनसेचा पक्का दावा असेल.
तर या मतदार संघात प्रभाग क्रमांक १८२, १९१ आणि १९४ या प्रभागांमध्ये शिवसेनेचा दावा असेल तर भाजपाला प्रभाग क्रमांक १९० आणि १९२ सोडले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असूनही माहिम विधानसभेत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना मताधिक्य होते, तर विधानसभा निवडणुकीत उबाठा, मनसे आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे उमेदवार स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेनेच्या सदा सरवणकर यांचा निसटता पराभव झाला. त्यामुळे या मतदार संघात सदा सरवणकर हे भाजपाच्या मदतीने सर्व प्रभाग आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मनसेने उबाठासोतबत जुळवून घेतल्याने त्यांची उबाठाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आमदार महेश सावंत हे मनसेच्या मदतीने पाचही प्रभागात आपले प्राबल्य राखण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मनसेला उबाठा किती जागा सोडते आणि भाजपासाठी किती जागा सोडल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि पिसे पांजरापूर येथील जलशुध्दीकरण ...
संभाव्य प्रभाग आणि संभाव्य उमेदवार
प्रभाग क्रमांक : १८२ (ओबीसी)(दावा उबाठा)
उबाठा : मिलिंद वैद्य, अभय तामोरे
शिवसेना : मिलिंद तांडेल, श्रध्दा पाटील
प्रभाग क्रमांक : १९० खुला (दावा मनसे)
भाजपा : शीतल गंभीर-देसाई,
मनसे : मनिष चव्हाण
उबाठा : राजू पाटणकर
प्रभाग क्रमांक : १९१ (ओबीसी महिला)(दावा उबाठा)
उबाठा : दीपाली साने, वैशाली पाटणकर
शिवसेना : प्रिया सरवणकर
प्रभाग क्रमांक १९२ (खुला प्रवर्ग) (दावा मनसे)
भाजपा : जितेंद्र राऊत, अक्षता तेंडुलकर, सचिन शिंदे
मनसे : यशवंत किल्लेदार/स्नेहल जाधव
प्रभाग क्रमांक १९४ (खुला प्रवर्ग)
उबाठा : भगत
मनसे : यशवंत किल्लेदार/संतोष धुरी
शिवसेना : समाधान सरवणकर