मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा तसेच जमीन घोटाळ्यात कारवाई न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पुण्यातीलच सहापैकी पाच अधिकारी आहेत, मग ही चौकशी निष्पक्ष कशी होईल? याकडेही दमानिया यांनी लक्ष वेधले.
पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यावरून पार्थ अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेऊन अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यातले आरोप करण्यात अंजली दमानिया देखील होत्या.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? शीतल तेजवानी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवते पण जिल्हाधिकारी कारवाई करत नाही. खरे तर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणात पॉवर ऑफ अॅटर्नीची नोंद नव्हती, व्यवहार करताना असावी लागते, पार्थ पवार कंपनीत ९९% भागीदार आहेत. हा व्यवहार होतोय हे पार्थ पवार यांना माहित होते. त्यांना शिक्षा भोगावीच लागेल. या घोटाळ्यात ७ ते १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते, याकडे दमानिया यांनी लक्ष वेधले.
पवारांच्या एकूण ६९ कंपन्या
अजित पवार यांच्या कुटुंबाच्या एकूण ६९ कंपन्या आहेत, मी सगळ्याचा अभ्यास करणार आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या कंपन्यांसंदर्भात खुलासा करणार आहे, असे सांगून संपूर्ण पवार कुटुंबच रडारवर असल्याचे दमानिया यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. सिंचन घोटाळा सिद्ध झाला होता, पण फडणवीस मित्र झाले आणि तुम्ही वाचले, असा टोलाही दमानिया यांनी अजित पवार यांना लगावला.