एक पोस्टर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी केला कट्टरपंथी व्यावसायिकांच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश! जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम



नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उध्वस्त करण्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या साध्या वाटणाऱ्या तपासाने महत्त्वाची भूमिका बजावली. १९ ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या नौगाम भागात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे काही पोस्टर्स चिकटलेले आढळले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पाकिस्तानस्थित हँडलर्सशी जोडलेले "व्हाइट-कॉलर टेरर मॉड्यूल" लवकरच उघडकीस आणले. या मॉड्यूलमध्ये कट्टरपंथी डॉक्टर, विद्यार्थी, मौलवी आणि इतर व्यावसायिकांचा समावेश होता जे एनक्रिप्टेड अॅप्सद्वारे भारतातील विविध शहरांमध्ये मोठ्या हल्ल्यांचा कट रचत होते. हरियाणा पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी २,९०० किलोग्रॅमहून अधिक स्फोटके, दोन एके-४७ रायफल आणि इतर शस्त्रेसाठा जप्त करत या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित नऊ संशयितांना अटक केली.



या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. उमर हा कारवाई दरम्यान फरार होता. मात्र १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आय२० कारमध्ये झालेल्या स्फोटात त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या इतर केंद्रीय संस्थांचा असा विश्वास आहे की ज्या आय२० कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती ती कार दहशतवादी डॉ. उमर चालवत होता. हे प्रकरण चिंताजनक आहे कारण त्यात डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित व्यवसायातील व्यक्तींचा समावेश होता, जे त्यांच्या व्हाईट कॉलर नोकऱ्यांच्या नावाखाली, देशात दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रे आणि स्फोटके साठवत होते. तपासात असे दिसून आले की हे आरोपी टेलिग्राम चॅनेलद्वारे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील हँडलर्सच्या संपर्कात होते.




दहशतवाद्यांचा पर्दाफाश केल्याचा घटनाक्रम


१९ ऑक्टोबर: श्रीनगरच्या नौगाम परिसरात रात्रीच्या वेळी जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर आढळले. ज्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी नौगाम पोलिस ठाण्यात UAPA, BNS, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरिफ निसार दार उर्फ ​​साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार उर्फ ​​शाहिद हे तीन ओव्हर-ग्राउंड कामगार नौगामचे रहिवासी असल्याची ओळख पटली. त्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात आली. ज्यात 'व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल'च पहिला दुवा मिळाला. या ओव्हर-ग्राउंड कामगारांच्या चौकशीतून जम्मू-काश्मीर पोलिसांन शोपियान येथील मौलवी इरफान अहमद, जीएमसी श्रीनगरमधील पॅरामेडिकल स्टाफ सदस्य आणि नौगाम मशिदीचे इमाम यांना ताब्यात घेतले. डॉक्टरांना कट्टरपंथी बनवण्यात इरफानने महत्त्वाची भूमिका बजावली.



५ नोव्हेंबर: मौलवी इरफानच सखोल चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, डॉ. आदिल राठरला उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे शोधून श्रीनगरला आणण्यात आल. आदिलच्या चौकशी दरम्यान त्याने देशभरातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोटांच्या नियोजनाची, स्फोटकांच्या साठवणुकीची ठिकाणे आणि त्यांचे इतर सहकारी डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांची माहिती उघड केली. तर शोपियान येथील मौलवी इरफान अहमद यांच्या फोनची तपासणी करताना एक टेलिग्राम चॅनेल समोर आले.



८ नोव्हेंबर: डॉ. आदिलच्या चौकशीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरिदाबाद पोलिसांच्या मदतीने हरियाणातील अल-फलाह विद्यापीठातून डॉ. मुझम्मिल गनईला अटक केली. मुझम्मिलला सुद्धा श्रीनगरला आणण्यात आले. पुलवामाचा रहिवासी आणि फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करणारा मुझम्मिल जैश-ए-मोहम्मदशी खोलवर संबंधित होता.  दरम्यान, जीएमसी अनंतनाग येथील डॉ. आदिलच्या जुन्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली.



९ नोव्हेंबर: ताब्यात घेतलेल्या दोन डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीतून जम्मू-काश्मीर पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबादमधील धौजा गावात डॉ. मुझम्मिल यांच्या भाड्याच्या खोलीतून स्फोटके आणि शस्त्रांचा साठा जप्त केला. तेथून २,९०० किलो आयईडी साहित्य जप्त करण्यात आले. तर पुढील चौकशीत मॉड्यूलचा प्रमुख डॉ. उमर याचे नाव उघड झाले. दरम्यान यूपी एसटीएफने मुझम्मिलची मैत्रीण आणि जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेशी संबंधित डॉ. शाहीन सईद यांना लखनऊ येथून अटक केली. तिच्या कारमधून सुद्धा एके-४७ जप्त करण्यात आली. तर मुझम्मिलने त्याच्या कारमध्ये लपवलेली बंदूक फरीदाबादमधील कचराकुंडीत फेकली होती, जी नंतर जप्त करण्यात आली.



१० नोव्हेंबर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका आय-२० कारचा स्फोट झाला, ज्यामध्ये नऊ जण ठार अनेकजण जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की या टोळीचा म्होरक्या डॉ. उमर स्फोट झालेली कार चालवत होता. त्यानंतर ही कार लाल किल्ल्याजवळील सुनहेरी मशिदीच्या पार्किंगमध्ये सुमारे तीन तास उभी राहिली आणि संध्याकाळी ६:२२ वाजता निघाली. यानंतर ६:५२ च्या आसपास कारचा स्फोट झाला. या कारमध्ये आयईडी होते, जे अद्याप पूर्णपणे तयार नव्हते. मात्र ते इतरत्र लावले जाणार होते.


११ नोव्हेंबर: लाल किल्ला स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सक्रीय झाली. पोलिसांनी पुलवामामध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. ज्यात उमरच्या आई वडीलांचा सहभाग आहे. तपास संस्था या व्यक्तींकडून डीएनए नमुने गोळा करतील आणि स्फोटाच्या वेळी डॉ. उमर कारमध्ये होते की नाही हे निश्चित करण्यासाठी आय२० कारच्या ढिगाऱ्यातून मिळालेल्या डीएनएशी त्यांची जुळणी करतील. या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर, नऊ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ज्यात गंदरबलचा जमीर अहमद अहंगर उर्फ ​​मुतलाशा आणि मेवातचा मौलवी हाफिज मोहम्मद इश्तियाक यांचा समावेश आहे.




'डॉक्टर्स ऑफ टेरर'चा सापळा


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे मॉड्यूल दोन वर्षांपासून सक्रिय होते. आरोपी डॉक्टर आणि त्यांचे विद्यार्थी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली निधी गोळा करत असून पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्कात होते. त्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याची योजना आखली होती, कारण ते फरीदाबादच्या जवळ आहे. मौलवी इरफानने पाकिस्तानी हँडलर्सच्या सूचनेनुसार मुझम्मिल, आदिल आणि उमर या तीन डॉक्टरांना कट्टरपंथी बनवले. सुरक्षा एजन्सींकडून अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सिस्टमचा वापर केला. या तपासातून कट्टरपंथी व्यावसायिकांच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश झाला आहे.



Comments
Add Comment

धरमशाला येथे २१ महिन्यांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामना

नवीन विंटर राई ग्रासने स्टेडियम सजवले धरमशाला : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला जवळजवळ २१ महिन्यांनंतर

दिल्ली स्फोटानंतर कोलकातामध्ये सुरक्षा वाढवली

कोलकाता :  दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, कोलकाता पोलिसांनी ईडन गार्डन्स स्टेडियमवरील सुरक्षा वाढवली आहे आणि भारतीय

जैश-ए-मोहम्मदचे व्हाईट कॉलर नेटवर्क उद्ध्वस्त, २९२३ किलो स्फोटके आणि शस्त्रे जप्त

नवी दिल्ली : सरकार आणि सुरक्षा संस्थांच्या सतर्कतेमुळे हल्ले करण्यास दीर्घकाळ असमर्थता दर्शविल्याने निराश

दिल्ली स्फोटातील ‘त्या’ आय २० कारने कुठून कसा केला प्रवास?

या घटनाक्रमात ही गाडी ठरतेय महत्वाचा फॅक्टर नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी,

डॉ. शाहिनाच्या अटकेमुळे जैश-ए-मोहम्मद कारवाईतील महिला सहभाग उघड

नवी दिल्ली  : फरिदाबाद येथील दहशतवादाचे मोड्युल पोलिसांनी उधळून लावले. त्यात दिल्ली कार स्फोट प्रकरणात तारिक

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

नवी दिल्ली : दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगतानाच या स्फोटाचे