पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात
सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार बनवू इच्छितात; परंतु तुमच्या मुलांना ते गुंड बनविणार आहेत. बिहार हे कधीही स्वीकारणार नाही. जंगल राज म्हणजे पिस्तूल, क्रूरता, भ्रष्टाचार आणि शत्रुत्व. ते मुलांच्या हाती पिस्तुल देत आहेत, लॅपटॉप देत आहोत,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
राहुल गांधींसोबतच पंतप्रधान मोदी यांनी आरजेडीवरही हल्ला चढवला. बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त सीतामढी येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘तुम्ही आरजेडीची प्रचारगीते आणि घोषणा ऐकल्या तर तुमचा थरकाप उडेल. आरजेडी बिहारच्या मुलांसाठी काय करू इच्छिते हे त्यांच्या नेत्यांच्या निवडणूक प्रचारात स्पष्टपणे दिसून येते. आरजेडीच्या व्यासपीठांवर निष्पाप मुलांना हे बोलण्यास भाग पाडले जात आहे; ती मुले म्हणत आहेत की त्यांना गुंड बनायचे आहे. हे लोक त्यांच्या स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार बनवू इच्छितात, परंतु तुमच्या मुलांना गुंड बनवू इच्छितात. बिहार हे कधीही स्वीकारणार नाही. बिहारला अशी कट्टा, कुशासन आणि भ्रष्टाचाराचे सरकार नको आहे. जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला प्रोत्साहन देत’ असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत म्हटले की, एका १० वर्षांच्या मुलाला निवडणूक मंचावरून राजद उमेदवाराच्या उपस्थितीत पिस्तूल आणि गुंडगिरीबाबत बोलताना दाखवले आहे.आजच्या बिहारमध्ये ‘हात वर’ म्हणणाऱ्यांसाठी जागा नाही. बिहारला आता स्टार्टअप्सचे स्वप्न पाहणाऱ्यांची गरज आहे. आम्हाला पुन्हा एकदा बंदूकधारी सरकार नको, एनडीए सरकार, अशी घोषणाही त्यांनी दिली.
बिहार विधानसभेसाठी ६ नोव्हेंबर रोजी ६५.०७ टक्के मतदान झाले. या टक्केवारीबद्दल नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले. तुम्ही विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. त्यांची रात्रीची झोप उडत आहे", असेही मोदी म्हणाले. दरम्यान, बिहार निवडणुकीचा दुसरा आणि शेवटचा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
बिहारच्या निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बेगूसरायमध्ये मच्छीमारांची भेट घेतली होती. दरम्यान, ते जवळच्याच एका तालावावरही गेले होते. तलावावर गेल्यानंतर, त्यांनी बोटीवरून पाण्यात उडीही मारली होती. यावेळी माजी मंत्री मुकेश सहनी त्यांच्यासोबत जाळेही टाकले होते. कन्हैया कुमार आणि काही मच्छिमारही त्यांच्यासह कमरेपर्यंत गढूळ पाण्यात उतरले होते. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला आहे. राहुल गांधींच्या या डुबकीवरून पंतप्रधान मोदींनी थेट निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, काही मोठमोठे लोक आता बिहारमध्ये मासे बघण्यासाठी येत आहेत. पाण्यात डुबकी मारत आहेत. बिहारच्या निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस करत आहेत.