मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी विभागात मुख्य मार्ग व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ वाजल्यापासून ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ वाजल्यापासून ते दुपारी ३. ३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. हार्बर मार्गावर हा ब्लॉक कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते संध्याकाळी ४ . १० या वेळेत ब्लॉक राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.३४ ते दुपारी ३ . ३६ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून १०.१७ ते दुपारी ३. ४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला तसेच पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.