मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी खोळंबल्यांने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लोकल बंद असल्याने लोक रेल्वे रुळावरूनच चालत जात होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या अंबरनाथ फास्ट लोकलने चार प्रवाशांना उडवले. त्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर-सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली.
प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचे जे आंदोलन झाले, त्यामुळेच हा अपघाताची घटना घडल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला. मृत महिलांची ओळख पटवण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले आहेत. मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले. यामध्ये एनआरएमयूकडून गुरुवारी संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला. मोटरमनही यात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी सीएसएमटी स्थानकावर बसून घोषणाबाजी करत आंदोलन केले. हे आंदोलन संध्याकाळी ५.४०च्या सुमारास सुरू झाले होते. ते ६.४० पर्यंत सुरू होते. या आंदोलन काळात मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. पण वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन स्थगित झाले. यानंतर हळूहळू एक-एक लोकल ट्रेन सुरू झाली. यानंतर मस्जिद बंदर-सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली.
मृत्यूला सरकार कोणाला कारणीभूत ठरवणार?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका सर्वच स्थानकावरील प्रवाशांना बसला आहे. आंदोलनामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, अनेक गाड्या उशिराने धावल्या, तर काही रद्द करण्यात आल्या. प्रवाशांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत ‘हा प्रश्न तुमचा आहे, मग त्रास आम्हाला का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. गर्दीमुळे पुन्हा एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण, असा प्रश्नही मुंबईकर विचारत आहेत. प्रवासी संघटनांवर देखील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एक तास गाड्या उशिराने असल्याने प्रवाशांनी मिळेल त्या लोकलने घरी जाणे पसंत केले. दरम्यान, आजच्या घटनेत तीन जणांच्या मृत्यूला सरकार कुणाला कारणीभूत ठरवणार? ते पाहणे आता महत्त्वाचे आहे.
चर्चा करून आंदोलन थांबविले
जीआरपीने अभियत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांसोबत बोलून गाड्या सुरु केल्या आहेत. डीआरएम, डीएम सरांसोबत बोलून हे आंदोलन थांबवण्यात आले. पावणे सहापर्यंत गाड्या थांबल्या होत्या. पावणेसात वाजता पुन्हा लोकल सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवा उशिराने सुरु राहील, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला म्हणाले.