मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री. राणे म्हणाले की, जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा फायदा काजू उत्पादकांना होईल. या बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक असलेले परवाने तातडीने मिळावेत यासाठीही संबंधित विभागाने कार्यवाही करावी. या आढावा बैठकीत पणन मंडळ, स्मार्ट व मॅग्नेट, एफएसएसआय, रेल्वे या विभागाकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.