मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले आहेत. हा व्यवहार १२ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट्स २०१२ मध्ये ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याचा अर्थ, मागील १३ वर्षांत त्यांना या व्यवहारात सुमारे ४७% बंपर नफा मिळाला आहे. हे दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव ईस्ट येथील ओबेरॉय एक्सक्विझिट बिल्डिंगच्या ४७ व्या मजल्यावर होते.
पहिला फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठी ३० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी फी (रजिस्ट्रेशन फीस) लागली. हा व्यवहार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दुसरा फ्लॅट ममता सूरजदेव शुक्ला यांनी देखील ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठीही तेवढीच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी लागली. हा करार १ नोव्हेंबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दोन्ही फ्लॅट्ससोबत चार कार पार्किंगची जागा देखील विकण्यात आली आहे.