मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन्ही रनवे काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विमानतळ प्रशासनाने ही निर्णय देखभाल आणि दुरुस्तीच्या नियोजनाचा भाग म्हणून घेतला आहे. या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत रनवे बंद राहतील. पावसाळ्यानंतर दरवर्षीप्रमाणेच या वेळी रनवेची तपासणी, पृष्ठभाग दुरुस्ती, प्रकाशयोजना, खुणा आणि ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिक मूल्यांकन अशा कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
ही बंदी पूर्णतः पूर्वनियोजित असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाईन्सना आगाऊ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लाइट वेळापत्रकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या देखरेखीमुळे विमानतळाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जागतिक दर्जा अधिक बळकट होईल. ‘सेफ्टी-फर्स्ट’ या तत्त्वावर आधारित हा उपक्रम सीएसएमआयएच्या वार्षिक ऑपरेशनल सुसज्जता योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.