मुंबई : केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि संगणकीय अभ्यासक्रम हे स्वतंत्र विषय शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ पासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत अभ्यासक्रमाचे साहित्य, हँडबुक आणि डिजिटल संसाधने तयार केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली.
उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात एआय विषय समावेष्ट केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांत तिसरीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करायचा आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागणार आहे. प्राथमिक स्तरावर स्किल इंडिया इकोसिस्टममध्ये या विषयाचा समावेश करण्याच्या योजनेवर शिक्षण मंत्रालय काम करत आहे. अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे, या गोष्टी लवकरात लवकर कराव्या लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या वर्गनिहाय एआय अभ्यासक्रम तयार करीत आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. शिक्षण मंत्रालयाने शिक्षण व्यवस्थेला भविष्याभिमुख करण्याचे ठरविले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार करणे, हा त्यामागचा हेतू आहे. सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये सहावी ते बाराव्या वर्गापर्यंत एआय आधारित विषय शिकविला जात आहे. हा अभ्यासक्रम नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन २०२३च्या धर्तीवर असेल.