मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत टीम इंडियावर सहज विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता, पण भारतीय संघ ही संधी साधू शकला नाही. आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उरलेले तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.
या आधी टीम इंडियाने मेलबर्नच्या ऐतिहासिक MCG मैदानावर ६ टी-20 सामने खेळले होते, ज्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आणि फक्त एकदाच पराभव पत्करला होता तोही २००८ मध्ये. त्यानंतर १७ वर्षे भारत या मैदानावर विजयी राहिला होता, पण अखेर हा रेकॉर्ड तुटला.
भारताने दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात केली. कर्णधार मिचेल मार्श (४६ धावा, २६ चेंडू) आणि ट्रॅव्हिस हेड (२८ धावा, १५ चेंडू) यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. नंतर इंग्लिस, टिम डेविड, ओव्हन आणि शॉर्ट हे फलंदाज जास्त चमक दाखवू शकले नाहीत, शेवटी मार्कस स्टोइनिसने शांतपणे खेळ करत १३.२ षटकांत संघाला लक्ष्य गाठून दिले. जसप्रीत बुमराहने एका षटकात दोन विकेट्स घेत सामन्यात थोडी रंगत आणली,पण ती अपुरी ठरली.
भारताची फलंदाजी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. केवळ अभिषेक शर्मा (६८) आणि हर्षित राणा (३५) यांनीच थोडा लढा दिला. बाकीचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. पॉवरप्लेमध्येच भारताने ४ गडी गमावले आणि संपूर्ण संघ १२५ धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर अतिशय सोपे लक्ष्य ठेवण्यात आले, जे त्यांनी सहज पार केले.