मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘द फॅमिली मॅन ३’ हा सीझन २१ नोव्हेंबरपासून भारतासह जगभरातील २४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
राज आणि डीके या लोकप्रिय जोडीने त्यांच्या D2R Films बॅनरखाली या नवीन सीझनचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हा भाग आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि रोमांचक कथानकासह सादर केला जाणार आहे.
या सीझनमध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसणार आहेत. हुशार गुप्तहेर जो एक पती आणि वडील म्हणूनही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो. मालिका राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिली असून संवाद लेखन सुमित अरोरा यांनी केले आहे. दिग्दर्शनात राज, डीके, सुमन कुमार आणि तुषार सेठ यांचा सहभाग आहे.
या सीझनमध्ये श्रीकांत तिवारीला अधिक मोठे धोके आणि आव्हाने उभे राहणार आहेत. त्याला दोन नव्या शक्तिशाली प्रतिस्पर्धी जयदीप अहलावत (रुक्मा) आणि निमरत कौर (मीरा) यांना सामोरे जावे लागेल. देशाच्या आत आणि बाहेरील कटकारस्थानांचा पर्दाफाश करताना श्रीकांतची क्षमता आणि मर्यादांची कसोटी पाहायला मिळणार आहे.
या भागात मागील सीझनमधील लोकप्रिय पात्रांसोबतच नवीन पात्रांचीही ओळख करून दिली जाणार आहे, शारिब हाश्मी (जे.के. तलपदे), प्रियामणी (सुचित्रा तिवारी), आश्लेषा ठाकूर (धृती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व), श्रेया धनवंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी).
प्राइम व्हिडिओ इंडियाचे प्रमुख निकिल मधोक म्हणाले, “द फॅमिली मॅनने भारतीय वेब कंटेंटमध्ये नवा अध्याय लिहिला आहे. ही मालिका आज पॉप संस्कृतीचा एक भाग बनली आहे. राज आणि डीके यांच्या D2R Filmsसोबत आमचे सहकार्य नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार आणि आकर्षक कथा देणारे ठरले आहे.”
ते पुढे म्हणाले, “आगामी सीझनमध्ये ॲक्शन, थरार आणि हलक्या-फुलक्या विनोदाचा उत्तम संगम असेल. उत्कृष्ट कलाकार आणि प्रभावी कथानकामुळे हा सीझन अधिक खास ठरेल. आम्ही जगभरातील प्रेक्षकांसमोर ‘द फॅमिली मॅन ३’ सादर करण्यासाठी उत्सुक आहोत.”