मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईच्या २२७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार राज्य निवडणू आयोगाने मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील २२७ प्रभागांची आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार एसी व एसटी महिला व पुरुष, यांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. जनसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने याचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत सदस्यांमधून ६१ सदस्यांची लॉटरी ओबीसी प्रवर्गासाठी काढली जाईल. त्यातील महिला व पुरुष यांचे आरक्षण चिठ्ठया काढण्यात आल्यानंतर उर्वरीतांपैंकी महिलांचे आरक्षण काढून पुढील सर्व उर्वरीत हे प्रभाग हे खुल्या प्रवर्गात काढले काढले जातील.
महापालिकेच्यावतीने सध्या मतदार याद्या प्रभाग निहाय बनवण्याच्या कामांना गती देण्यात आली असून मतदार याद्यांचा प्रारुप याद्या येत्या ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द करून जनतेकडून हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत.
प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम असा आहे
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे : ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५
आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : ६ नोव्हेंबर २०२५
आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहिर करणे : ११ नोव्हेंबर २०२५
प्रारुप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे : १४ नोव्हेंबर २०२५
प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख : २० नोव्हेंबर २०२५
हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी घ्यावयाचा निर्णय : २१ ते २७ नोव्हेंबर २०२५
अंतिम आरक्षण जाहीर करून वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : २८ नोव्हेंबर २०२५
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संभाव्य एस टी आणि एसी वॉर्ड
अनुसूचित जमाती (एसटी)
प्रभाग क्रमांक ५३ आणि प्रभाग क्रमांक १२१
अनुसूचित जाती (एसी)
प्रभाग क्रमांक २६, ९३, ११८,१३३, १४०, १४१, १४६, १४७, १५१, १५२,१५५,१८३, १८६, १८९, २१५