शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी?
मुंबई : राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिरसाट यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शिरसाट काय म्हणाले?
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "राजकारण दिवसेंदिवस वाईट होत चालले आहे. त्यामुळे झालं तेवढं पुरे झालं, आता थांबावं असं वाटतंय. राजकारणात आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर ते अधिक बरं असतं."
निवृत्ती की राजकीय खेळी?
संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सिडको भूखंड प्रकरण (५ हजार कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा रोहित पवारांचा आरोप), बेडरूममधील पैशांची बॅग आणि सामाजिक न्याय विभागातील टेंडर घोटाळा अशा अनेक वादांमुळे शिरसाट चर्चेत आहेत.
विरोधकांनी वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे ते मंत्रिमंडळात कायम आहेत.
अशा परिस्थितीत, संजय शिरसाट यांचा हा निवृत्तीचा निर्णय खरंच मनापासून आहे, की कुटुंबातील नव्या पिढीला (घराणेशाहीतून) राजकारणात सक्रिय करण्यासाठी ही त्यांची रणनीतिक खेळी आहे? याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.