या दिवाळीत आनंद आणि प्रकाशाऐवजी, भोपाळ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील अनेक कुटुंबांसाठी 'कार्बाइड गन' नावाचे खेळणे दुःस्वप्न घेऊन आले. या स्वस्त फटाक्यांच्या खेळण्यामुळे लहान मुले आणि वृद्धांसह १२५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. डॉक्टरांच्या मते, हा आकडा २०० पर्यंतही असू शकतो.
या गनमधून निघणाऱ्या तुकड्यांमुळे अनेक रुग्णांचे डोळे कायमचे खराब झाले, ज्यामुळे अनेकांना कायमचा अंधत्व आले आहे. मध्य प्रदेशात एकूण १४ लोकांना कायमचे अंधत्व आले आहे.
या गनची किंमत फक्त २०० आहे. ती प्लॅस्टिकचे पाईप, गॅस लाइटर आणि कॅल्शियम कार्बाइड वापरून बनवली जाते. पेटवल्यावर यातून निघणारा ॲसिटिलीन गॅस मोठा आवाज करतो आणि स्फोट होतो. या स्फोटामुळे प्लॅस्टिकचे तुकडे गोळ्यांसारखे डोळे, चेहरा आणि शरीराला लागतात.
भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये दिवाळीच्या रात्रीच ४० रुग्णांवर उपचार करण्यात आले. नेत्ररोग विभागाच्या प्रमुख कविता कुमार यांनी या गनला 'खेळणे' नव्हे, तर 'जीवघेणा स्फोटक' म्हटले आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी १८ ऑक्टोबरलाच या गनच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते, तरीही सोशल मीडियातील ट्रेंडमुळे त्या मोठ्या प्रमाणावर विकल्या गेल्या.
तीन दिवसांत १२२ हून अधिक लहान मुलांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत
अवघ्या तीन दिवसांमध्ये मध्य प्रदेशात १२२ हून अधिक मुलांना डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर यापैकी १४ मुलांनी आपली दृष्टी गमावली असल्याची बाब समोर आली आहे.
अशा प्रकारच्या घटनांची सर्वाधिक झळ ही मध्य प्रदेशच्या विदिशा या जिल्ह्यात बसली आहे. हमिदीया रुग्णालयात उपचार घेत असलेली सतरा वर्षीय नेहाने रडत-रडत सांगितले की, ‘आम्ही घरी बनवलेली कार्बाइड गन विकत घेतली. जेव्हा तिचा स्फोट झाला, तेव्हा माझा एक डोळा पूर्णपणे भाजला. मला काहीच दिसत नाही.’
राज विश्वकर्मा नावाच्या दुसऱ्या एका पीडित मुलाने कबूल केले, “मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले आणि घरीच फटाक्याची ही बंदुक बनवण्याचा प्रयत्न केला. ती माझ्या चेहऱ्यासमोरच फुटली… आणि त्यामुळे माझा डोळा गमावला.”
विदिशा पोलिसांनी या उपकरणांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी सहा लोकांना अटक केली आहे. इन्स्पेक्टर आर. के. मिश्रा म्हणाले, “तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. या कार्बाइड गनची विक्री करणाऱ्या किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कायदेशीर परिणाम भोगावे लागतील’.
भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि ग्वाल्हेर येथील रुग्णालयांमध्ये, या कारबाइड गनमुळे डोळ्यांना जखम झालेल्या तरूण रुग्णांनी वॉर्ड भरले आहेत. केवळ भोपाळच्या हमिदीया रुग्णालयात ७२ तासांत २६ लहान मुलांना दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांकडून या कार्बाइड गनच्या वापराबद्दल इशारा दिला जात आहे. हमिदीया रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. मनिश शर्मा म्हणाले की, ‘या उपकरणामुळे थेड डोळ्यांना इजा होते. स्फोटामधून धातूचे कण आणि कार्बाइडची वाफ बाहेर पडते, ज्यामुळे रेटिना जळून जातो. आम्ही अशा अनेक रुग्णांवर उपचार करत आहोत, ज्यामध्ये मुलांच्या डोळ्यांतील बाहुल्यांना जखम झाली आहे, ज्यामुळे त्यांना कायमचे अंधत्व आले आहे.’
लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात कार्बाईड गनचा वापर
काही रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत, आणि कदाचित अनेक जणांना त्यांची दृष्टी पूर्णपणे कधीच परत मिळणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुले प्लॅस्टिक किंवा टिन पाईप वापरू करून ही ‘कार्बाइड गन’ बनवत आहेत. या पाईपमध्ये गनपावडर, काडीपेटीच्या काड्यांचे डोके आणि कॅल्शियम कार्बाइड भरले जाते आणि एका छिद्रातून ते पेटवले जाते, ज्यामुळे मोठा आवाज होतो. आणि या स्फोटातून बाहेर पडणारे पदार्थ अनेकदा थेट चेहरा आणि डोळ्यांना आदळतात. या धोकादायक ट्रेंडला इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स मधून हवा मिळताना पाहायला मिळते. याचे ‘फायर क्रॅकर गन चॅलेंज’ म्हणून टॅग केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे तरूण लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात ही कार्बाईड गन वापरताना दिसत आहेत.