PM Modi On Trump Phone Call : ट्रम्प म्हणाले 'ट्रेड', तर मोदींनी दिले 'दहशतवादा'वर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत! फोन कॉलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सातत्याने सकारात्मक विधाने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या (Diwali) शुभ मुहूर्तावर या दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांशी फोनवरून संवाद साधला आणि परस्परांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत फोनवर बोलणे झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आणि लिहिले, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमचा फोन कॉल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांसाठी खूप-खूप धन्यवाद.” पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये या संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “या प्रकाशोत्सवात आपल्या दोन महान लोकशाहींनी जगाला आशेचा किरण दाखवला आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपल्याला एकजूट रहावे लागेल.” या संवादातून दोन्ही देशांमधील मजबूत संबंध आणि जागतिक स्तरावर शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या त्यांच्या निर्धाराची पुष्टी झाली आहे.



ट्रम्प म्हणाले... भविष्यात भारत रशियाकडून


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिवाळीच्या निमित्ताने फोनवर झालेल्या संभाषणाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचे खुलासे केले. ट्रम्प म्हणाले, “मी भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि आमची खूप चांगली चर्चा झाली. आम्ही व्यापाराबद्दल बोललो.” त्यांनी स्पष्ट केले की, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी प्रामुख्याने व्यापाराच्या (Trade) विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला. ते म्हणाले, “भविष्यात भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणार नाही.” मोदींसोबतच्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी केलेला हा दावा दोन्ही देशांच्या ऊर्जा धोरणांच्या संदर्भात लक्षवेधी ठरतो. यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेत दिवाळी साजरी करणाऱ्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. ते म्हणाले होते, “आज प्रकाश पर्व दिवाळी आहे. हा सण साजरा करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना मी शुभेच्छा देतो. कुटुंब आणि मित्रपरिवाराने एकत्र येऊन सेलिब्रेट करण्याची ही वेळ आहे.”



मोदी-ट्रम्प यांच्या संवादानंतर आशेचा किरण.


सध्या भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक धोरणांसंदर्भात अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत. विशेषतः 'टॅरिफ' (Tariff) आणि 'ट्रेड डील' (Trade Deal) या विषयांवर दोन्ही देशांचे संबंध काहीसे ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या काही वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लादला आहे. या उच्च शुल्कामुळे भारताची निर्यात (Export) कमी झाली असून, याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) वाढीला बसला आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दिवाळीनिमित्त झालेल्या संवादानंतर आता या तणावातून लवकरच मार्ग निघू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही नेत्यांनी व्यापारावर चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्यामुळे, भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रलंबित असलेल्या व्यापार करारावर (Trade Agreement) लवकरच सकारात्मक तोडगा निघेल आणि द्विपक्षीय संबंध पूर्ववत होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Diwali Bonus Son papdi : 'बोनसऐवजी सोनपापडी' मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचा 'सूड'; संतप्त कामगारांनी मिठाईचे बॉक्स गेटबाहेर दिले फेकून, Video व्हायरल

सोनीपत : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह (Diwali Celebration) असताना, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून बोनसची

Chhath Puja Special Railway : छठ पूजेसाठी भारतीय रेल्वे सज्ज! प्रवाशांची विक्रमी गर्दी पाहता १२०००+ विशेष गाड्या धावणार; सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेच्या (Chhath Puja) सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी रेल्वे, बस किंवा विमानाने आपल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने