नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात त्यांनी अयोध्येतील राम मंदिर, 'ऑपरेशन सिंदूर', नक्षलप्रभावित भागातील बदल, आर्थिक सुधारणा आणि देशाच्या भविष्यातील दिशेबाबत आपली भूमिका मांडली आहे.
मोदींनी नमूद केलं की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतरची ही दुसरी दिवाळी असून, प्रभू श्रीरामाच्या आदर्शांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अन्यायाचा बदला घेतला. त्यांनी म्हटलं, “राम आपल्याला सन्मान टिकवण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शिकवण देतात. भारतानेही हेच केलं.”
नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासाचे प्रकाशदिवे
पंतप्रधानांनी त्यांच्या पत्रात देशातील नक्षलग्रस्त भागातील बदलांवर भर दिला. अनेक जिल्ह्यांत, जे आधी हिंसाचारामुळे अंधारात होते, आता प्रथमच दिवाळीच्या दिव्यांनी उजळले आहेत. विकासाच्या प्रवाहात या भागांचा समावेश होणं ही भारतासाठी मोठी कामगिरी असल्याचं मोदींनी सांगितलं.
आर्थिक स्थैर्य आणि सुधारणा
नुकत्याच झालेल्या जीएसटी दरातील कपातीमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार नागरिकांची हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था स्थिरतेचं आणि लवचिकतेचं प्रतीक ठरत असून, देश लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वदेशी आणि आरोग्याच्या दिशेने पाऊल
पंतप्रधानांनी जनतेला स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करावा, आपल्या जीवनशैलीत स्वच्छता, योग आणि आरोग्यविषयक सवयी जोपासाव्यात, असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी तेलाचे प्रमाण १०% नी कमी करण्याची आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली.
सकारात्मकतेचा दीप उजळवण्याचं आवाहन
मोदींनी पत्राचा शेवट करताना एक महत्त्वाचा संदेश दिला, “जसं एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो आणि प्रकाश वाढतो, तसंच आपणही समाजात एकमेकांमध्ये सहकार्य, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवावा.”
पंतप्रधान मोदींचं हे पत्र म्हणजे देशवासियांना प्रेरणा देणारा आणि एक सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण भारत उभारण्याच्या दिशेने मार्गदर्शन करणारा संदेश आहे.