मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या पक्षीगृहाच्या उभारणीसाठी कंत्राटदार निवडीकरता निविदा मागवण्यात आली आहे. मात्र या निविदेला प्रतिसाद न लाभल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
नाहूर, मुलुंड (पश्चिम) येथे मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सुमारे १७१३९.६४ चौरस मीटर क्षेत्रफळांपैकी सुमारे १०,८५९ चौरस मीटर क्षेत्रफळावर पक्षीगृह बांधण्यात येणार आहे. त्याबाबत महाटेंडर पोर्टलवर १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राप्त होतील, अशा रितीने निविदा मागविण्यात आली होती. या निविदेस अल्प प्रतिसाद प्राप्त झाल्यामुळे निविदा सादर करण्याची कालमर्यादा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार वाढविण्यात आली आहे.
पक्षीगृह समवेत तिकीट घर, स्वच्छतागृह, भूमिगत वाहनतळ इत्यादी सुविधा या प्रकल्पात प्रस्तावित आहेत. या सुविधेमुळे पक्षी तथा प्राणी आणि पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढेल तसेच महानगरपालिकेच्या महसुलातही भर पडेल. या पक्षीगृहाचे बांधकाम वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील बांधण्यात आलेल्या पक्षीगृहासारखे असेल आणि त्यामुळे पर्यटकांना मुलुंड पक्षीगृहाच्या स्वरुपामध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध होइल. भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयास भेट देण्यासाठी प्रवासाचे अंतर लक्षात घेता, मुंबईसह उपनगरीय भागात राहणारे नागरिक या पक्षीगृहाला भेट द्यायला नक्कीच प्राधान्य देतील, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. मुलुंड भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांचा यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू असून त्यांच्या मागणीनुसारच निविदा प्रक्रिया पर्यंत याचे काम पोहोचले आहे.