मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी गाजलेल्या गीतांचा, भावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.

ब्राम्हण सभा, डोंबीवली पूर्व येथे २० ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ७:०० वाजता रंगणाऱ्या या कार्यक्रमात निवेदिका – प्राची गडकरी यांचे निवेदन असून ख्यातनाम गायक ओंकार प्रभुघाटे, गायिका मृण्मयी भिडे, गायिका सोनिया पोंक्षे, गायक निलेश गायकवाड, आपली कला सादर करतील तर धनंजय पुराणिक, रवी पोंक्षे, रुपेश गायकवाड, कमलाकर मेस्त्री, अर्णव सुमित कानेटकर हे वादक कलाकार गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.