युद्धात ठार झालेला एकमेव हिंदू
इस्रायल-हमास युद्धात नेपाळचा तरुण विद्यार्थी बिपिन जोशीला हमासच्या दहशतवाद्यांकडून ठार करण्यात आले. बिपिनने गाझाच्या रणभूमीत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले. हमासच्या कैदेतून त्याचा मृतदेह परत आल्यानंतर संपूर्ण नेपाळ आणि इस्रायल शोकमग्न झाले आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू होता. मात्र, हा संघर्ष आता थांबला आहे. इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रायल-हमासमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी कार्यक्रम तयार करत हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर या प्रस्तावावर इस्रायल-हमासने सहमती दर्शवली आणि त्यानंतर या कराराचा एक भाग म्हणून ओलिसांची सुटका करण्यात आली.
हमासने इस्रायली ओलीसांना सोमवारी मुक्त केलं, तर इस्रायलनेही हमासच्या ओलीसांची मुक्तता केली. दरम्यान, यावेळी हमासने २० जिवंत ओलीसांना सोडलं. याचवेळी हमासने चार मृत इस्रायली बंधकांची नावे जाहीर करत त्यांचे मृतदेह इस्रायलकडे सोपवले. या चार जणांच्या बळींमध्ये एकमेव हिंदू ओलीस बिपिन जोशी यांचाही समावेश आहे. बिपिन जोशी मूळचा नेपाळमधील आहे.
वृत्तानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यादरम्यान त्याचं अपहरण झालं होतं. हल्ल्याच्या वेळी २२ वर्षांचा बिपिन जोशी नेपाळहून गाझा सीमेजवळील किबुट्झ अलूमिम येथे शेती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेला होता. तेव्हापासून तो जिवंत असल्याचे मानणारे एकमेव गैर-इस्रायली आणि एकमेव हिंदू ओलीस होते. गाझा युद्धबंदी कराराचा एक भाग म्हणून सोमवारी त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे.