राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागलाय. तर दुपारी कडाक्याचे ऊन पडलेले असते. परंतु, दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ला निना तापमानात प्रचंड घट होऊन यंदा तीव्र हिवाळा जाणवणार असे हवामान विभागाने सांगितले आहे.
सध्या दिल्ली एनसीआरमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि उत्तरेकडील मैदानी भागातही तापमान घट होतेय. त्यामुळे यंदा लवकर हिवाळ्याला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी तापमानात घट झाली. मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट झाल्यामुळे ला निना परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम हवामानावर होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
ऑक्टोबर अखेरनंतर 'ला निना'चा प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिप्रमाणात थंडीचा अंदाज मांडण्यात येत आहे. आयएमडीचा अंदाज आहे की, काही दिवसात ला निना प्रभाव सुरू होईल. या थंडीची तीव्रता नेमकी किती असेल, याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान अति प्रमाणात कमी होऊ शकते.