नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३८ जणांना नामांकन मिळाले आहे. ज्यात २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नामांकन मिळाले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार का? अशी चर्ची सर्वत्र आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार सांगितले आहे की, ते या पुरस्काराचे पात्र आहेत. कारण, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धासह इतर सात युद्धे रोखली आहेत. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प हटून बसल्याने जागतिक चर्चेचा विषय झाला आहे. ट्रम्पप्रमाणेच या शर्यतीमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि पोप फ्रान्सिस (ज्यांचे एप्रिलमध्ये निधन झाले) यांचा समावेश आहे. त्यामुळे २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारावर कोणाचे नाव आहे, याची उत्सुकता जागतिक पातळीवर आहे.
शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला जातो? १९०१ ते २०२४ या कालावधीत एकूण १४२ व्यक्ती आणि संस्थांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ज्यापैकी १११ व्यक्ती आणि ३१ संस्थांचा समावेश आहे. हा पुरस्कार ज्यांच्यामुळे दिला जातो, त्या अल्फ्रॅड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार, राष्ट्रांमधील बंधुत्वासाठी, स्थायी सैन्यांचे उच्चाटन किंवा घट करण्यासाठी आणि शांतता परिषदांचे आयोजन आणि प्रोत्साहन देणे असे पुरस्काराचे निकष आहेत. यावर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे हा पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.






