Sunday, November 9, 2025

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नसला तरी आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत धारावीमध्ये भाजपचे कमळ नक्कीच फुललेले पहायला मिळेल. धारावीमध्ये दोन जागा निवडून आणून हे कमळ फुलवले जाणार आहे. सध्या या लोकसभा मतदार संघातील माहीम, धारावी, अणुशक्ती नगर, चेंबूर, वडाळा आणि शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सात नगरसेवक असले तरी भविष्यात ही संख्या १५ ते १८ एवढी निश्चितच पहायला मिळेल असा विश्वास भाजपचे नवनियुक्त दक्षिण मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निरज उभारे यांनी व्यक्त केला.

भाजपच्या मुंबईतील नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाली असून दक्षिण मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निरज उभारे यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. त्यांचे विचार जाणून घेतले. जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलतांना त्यांनी, मी बारावीत असताना विभागातील एका स्थानिक मंडळात सक्रिय होतो आणि त्याचवेळी चाळीतील शौचालयाचे रखडलेले काम संघर्ष करत ते बांधून घेतले. यादरम्यान अनेकांशी वाद झाला. त्यामुळे राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता बनून काम केले. भाजपचे काम करताना माझ्यावर सर्व प्रथम वॉर्ड युवा मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

स्थानिक पातळीवर पक्षाची संघटन बांधणी केल्यानंतर माझी नियुक्ती मंडल युवा मोर्चा सरचिटणीसपदी झाली. तेथील कामाने प्रेरित होऊन पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती केली. इथे चार ते साडेचार वर्षे काम केले. त्यानंतर माझ्यावर जिल्हा सरचिटणीस तथा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची माझी कार्यपद्धती असल्याने आता जिल्हाध्यक्षपदी बदल करताना पक्षाने माझा विचार केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशीष शेलार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांचे आभार मानतो.

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काय बदल केले याबाबत सांगताना ते म्हणतात की, मी दुसऱ्याच दिवसापासून ज्यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले अशा सर्व पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर १७मंडल अध्यक्षांच्या सभा घेत केंद्र आणि राज्य सरकाच्या योजना तसेच केलेली विकास कामेही जनतेपर्यंत कशाप्रकारे पोहोचवली जावीत याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा सप्ताह आयोजित केला होता, त्यात रक्तदान, स्वच्छता मोहीम,नमो नेत्र संजीवनी अशा विविध कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी एक टिम म्हणून काम केले. १७ मंडल अध्यक्षांनी रक्तदान शिबीर आयोजित करून ७८ हजार रक्त बाटल्यांचे संकलन करून रुग्णालयांकडे सुपूर्त केले. नमो नेत्र संजीवनीमध्ये ४२ ठिकाणी शिबीर आयोजित करून दीड लाख चष्म्यांचे वाटप केले.

सन २०१९ आणि २०२४ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील निकालांबाबत जिल्ह्यातील जय-पराजयबाबत बोलतांना ते म्हणाले की, या दोन्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकत्यांनी प्रचंड मेहनत केली. बुथप्रमुख, शक्ती केंद्र यांची प्रचंड बांधणी करून मतदार संघातील प्रत्येक समाजाच्या घटकांपर्यंत केंद्रीय निरीक्षक तसेच आमचे कार्यकर्ते पोहोचत होते. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवारा राहुल शेवाळे जिंकले, पण सन २०२४मध्ये संविधानाबाबत विरोधी पक्षाने केलेला खोटा प्रचार यामुळे त्यांचा पराभव झाला. केवळ ५० हजार मतांनी पराभव झाला. पण त्यानंतर झालेल्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले. त्यामुळे जिल्ह्यात सहा विधानसभेपैकी चार विधानसभेत महायुतीचे आमदार निवडून आले. आता महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मागील २०१७च्या निवडणुकीत भाजपचे सहा विधानसभा क्षेत्रात ७ नगरसेवक निवडून आले होते, आता आगामी निवडणुकीत भाजपचे किती नगरसेवक निवडून येतील याबाबत बोलताना निरज उभारे म्हणाले की, सध्या सात नगरसेवक असले तरी भविष्यात १५ होतील आणि महायुतीच्या जागा वाटपात भाजपला दोन जागा अधिक मिळाल्यास भाजपचे १८ नगरसेवक निवडून येतील. माहीम विधानसभेत सध्या एकमेव भाजपची नगरसेविका असली तरी इथे दोन नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर धारावी विधानसभेत सध्या भाजपचा एकही नगरसेवक नसला तरी याठिकाणी येत्या निवडणुकीत कमळ फुलेल आणि दोन नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न राहील. तर वडाळ्यामध्ये एक नगरसेवक आहे, तिथे महायुतीने एक जागा सोडल्यास तीन नगरसेवक निवडून आणू, नाहीतर दोन नगरसेवक निवडून येतीलच. शीव कोळीवाडा मतदारसंघात भाजपचे दोन नगरसेवक आहेत, त्यातच माजी विरोधी पक्षनेते रवी राजा हेही भाजपमध्ये आल्याने या मतदारसंघात पाच नगरसेवक निवडून येतील. तर चेंबूर मतदारसंघात भाजपचे सध्या दोन नगरसेवक आहेत, इथेही महायुतीने जागा सोडल्यास तीन नगरसेवक निवडून येतील आणि अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात सध्या एकमेव नगरसेवक असला तरी आगामी निवडणुकीत येथील भाजपच्या नगरसेवकांची संख्या दोन असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. या बंधूंची युती तसेच मराठी व अमराठी मुद्दा याबाबत यंदाची निवडणूक रंगली जाईल असे बोलले जाते, याबाबत बोलताना उभारे म्हणतात की, हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने जिल्ह्यात भाजप तथा महायुतीचे नुकसान होणार नाही. आज मुंबईची विकासकामे कोणी केली आणि कोण करू शकतात हे आता जनतेला कळू लागले आहे. कोस्टल रोड, रस्ते सिमेंटीकरण, मलजल प्रक्रिया केंद्र, मुंबई मेट्रो रेल्वे हे राज्यात आणि केंद्रात असणारे भाजप सरकारच करू शकते. मराठी माणूस मुंबईत राहायला हवा, त्यासाठी महायुतीचे राज्यातील सरकार आणि देशातील पंतप्रधान मोदी सरकार खंबीरपणे काम करत आहे. महापालिकेत उबाठाकडे २५ वर्षे सत्ता होती, पण भ्रष्टाचाराशिवाय काय केले? कोविड काळातील मृतांच्या बॉडी बॅग, खिचडी, कोविड सेंटर आदींमधील भ्रष्टाचार उघडच आहे.

या देशाची संस्कृती आणि परंपरा ही हिंदुत्ववादी आहे, या देशातील जनतेची नाळ रामाशी जुळलेली आहे, राम मंदिराशी भावनिक नाते जोडलेले आहे. मराठी व गुजराती किंवा उत्तर भारतीय हा प्रांतिय मुद्दा उपस्थित करून भावना भडकवण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर योग्य नाही. या देशाला हिंदुत्व हे बळकटी देवू शकते. हिंदुत्व अखंड राहायला हवे. प्रांतिय वाद सोडून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र यायला हवे, तरच या देशात स्वाभिमानाने जगता येईल.

Comments
Add Comment