सध्याच्या धावपळीच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. बाहेरचे अति खाणे, अवेळी जेवणे आणि झोपणे, आहारामध्ये पोषकत्वाचा समावेश नसणे, मानसिक संतुलन बिघडणे यागोष्टींमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सची स्थिती बदलते. ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत हा परिणाम थेट मासिक पाळीवर होतो. त्यामुळे मासिक पाळीचा धोका दूर ठेवण्यासाठी महिलांनी काही घरगुती उपाय करणे गरजेचे आहे.
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजन वाढणे, ओटीपोटाभोवती चरबी तयार होणे, केस गळणे, चेहरा जाड होणे अशा समस्या उद्भवतात. ज्यामुळे पीसीओएस आणि पीसीओडी हे आजार डोकं वर काढतात. या आजारांवर कोणतेच ठराविक औषध नाही आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, मानसिक संतुलन या पर्यायांचा अवलंब केल्यास या आजारापासून दूर राहता येते. याप्रमाणेच ज्या महिलांना पीसीओएस आणि पीसीओडीचा त्रास आहे त्यांनी नियमित व्यायाम आणि योगसाधना करणे गरजेचे आहे.
पीसीओएस आणि पीसीओडीसाठी काही खास योगसाधनेचे प्रकार आहेत. ज्याचा उपयोग पोटाची चरबी कमी होणे, होर्मोन्सचे संतुलन ठेवणे, वजन कमी करणे याकरता होते. त्यामुळे पीसीओएस आणि पीसीओडीचा धोका कमी होतो. असे कोणते प्रकार आहेत ते जाणून घेऊया...
भद्रासन (फुलपाखरू आसन): पीसीओएस आणि पीसीओडीसाठी हे आसन फार उपयुक्त आहे. या आसनामुळे मांडीचा सांधा आणि ओटीपोटाचा भाग ताणला जातो, ज्यामुळे पुनरुत्पादक अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुधारते.
सेतू बंधनासन (पुलाची मुद्रा): हार्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करते आणि ओटीपोटाचा भाग मजबूत करण्यास मदत होते.
सूर्यनमस्कार : दररोज न चुकता किमान १० सूर्यनमस्कार केल्यान वजन कमी करण्यास, चयापचय सुधारण्यास आणि मासिक पाळी नियमित करण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळी नियमित करण्यासाठी सूर्यनमस्कार महत्त्वाचे आसन आहे.
पश्चिमोत्तानासन (पुढे वाकून बसणे): या आसनामुळे पोट आणि ओटीपोटाच्या भागात रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. ज्यामुळे अंडाशयाचे कार्य योग्यरित्या सुरु राहते.
दररोज वीस मिनिटं किमान ही चार आसने केल्यास पीसीओएस आणि पीसीओडीचा त्रास कमी करण्यास मदत होते.






