Saturday, November 8, 2025

शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

विरार (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर मागील आठवडाभरात १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यांत तब्ब्ल १०८ मोठे जाहिरात फलक गॅस कटरच्या साहाय्याने तोडत जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

वसई - विरार महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक लावायचे असल्यास पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशा जाहिरातदारांना अधिकृत परवानगी देत पालिका जाहिरात कर वसूल करते. पालिकेने पावसाळ्याच्या आधी धोकादायक जाहिरात फलक गॅस कटरच्या सहाय्याने तोडत कारवाई केली होती. तर नुकताच गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान पालिका हद्दीत शेकडो मंडळांतर्फे अनधिकृत जाहिरातबाजी, बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच राजकीय पक्षांतर्फे देखिल अनधिकृत जाहीरात फलक लावण्यात आले होते. अशा जाहिरात फलकांवर कारवाई करत पालिकेने दंड वसूल केला आहे.

दीड लाखांचा दंड वसूल केल्याचे पालिकेने सांगितले. यासह एकूण १० जाहिरात दारांवर या मागील आठवडाभरात गुन्हे दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, शहरात आजही अनधिकृत फलक उभे आहेत. अशा जाहिरात फलकांवर पालिकेतर्फे कारवाई सुरु आहे. अनधिकृत फलकांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येत असल्याचे जाहिरात विभागाने सांगितले. सध्या चालू वर्षात पालिकेने ७०४ जाहिरात फलकांना परवानगी दिली आहे.

मात्र तरीही या व्यतिरिक्त अनेक अनधिकृत जाहिरात फलक उभे असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त होत आहेत. त्यानुसार पालिकेने नुकताच कारवाई हाती घेतली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये जाणारे लहान रस्ते यावरील जाहिराती देखील कारवाई करत तोडण्यात येत आहेत. मागील सहा महिन्यात १०८ मोठे जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्स हे गॅस कटरच्या सहाय्याने तोडून पाडण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

Comments
Add Comment