दिवाळी सुट्ट्यांच्या दरम्यान एसटीच्या विशेष तिकीट पास दरात कपात केल्याने पर्यटक इतर वाहनांपेक्षा लालपरीच्या प्रवासाला पसंती देतील, अशी आशा महामंडळाला आहे. साधी, जलद, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, इ-शिवाई, रातराणी अशा सर्व बसगाड्यांमध्ये योजनेतील पास ग्राह्य आहे. या वेगवेगळ्या प्रकारांनुसार तिकीट दरात किमान २०० पासून कमाल १००० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या पासवर अमर्यादित प्रवासाची मुभा प्रवाशांना आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत जवळपास १५ टक्के भाडेवाढ महामंडळाने केली आहे. आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. मात्र राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली असून दिवाळी दरम्यान विशेष तिकीट पासचा दरही कमी केला आहे. ज्यात पर्यटकांना चार आणि सात दिवसाचा प्रवास करता येणार आहे.
'आवडेल तेथे प्रवास' योजनेंतर्गत साधी, जलद आणि रात्रसेवा बसला चार दिवसासाठी प्रौढांना १,३६४ आणि लहानग्यांना ६८५ एवढे तिकीटदर आहे. तर सात दिवसासाठी प्रौढांना २,३८२ आणि लहानग्यांना १,१९४ एवढे तिकीटदर आहे. शिवशाही आसनी बससेवेमध्ये चार दिवसासाठी प्रौढांना १,८१८ आणि लहानग्यांना ९११ इतके पैसे मोजावे लागणार आहेत. तर सात दिवसासाठी प्रौढांना ३,१७५ आणि लहानग्यांना १,५९० इतके तिकीट आहे. यासोबतच १२ मीटर ई-शिवाई बसला चार दिवसासाठी प्रौढांना २,०७२ आणि लहानग्यांना १,०३८ एवढे प्रवासी भाडे आहे. तर सात दिवसासाठी प्रौढांना ३,६१९ आणि लहानग्यांना १,८१२ इतके पैसे मोजावे लागणार आहेत.