विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. या भाषणात देश-विदेशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली.
विजयादशमीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोलाचे विचार मांडले. भारताच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्त्वाचे आहे. सरसंघचालकांनी सुरुवातीला शेजारील देशांतील परिस्थितीवर भाष्य केलं. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये असलेल्या असंतोषाचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केलं की, हिंसक आंदोलनामुळे कधीच समस्या सुटत नाहीत, हिंसेमुळे फक्त तात्पुरती अस्थिरता निर्माण होते, मात्रं खरं परिवर्तन फक्त लोकशाही मार्गानेच होऊ शकतं, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विचारांनाही अधोरेखित केलंय.
धर्म विचारून हत्या करणं ही अमानुष कृत्यं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र भारतीय सैन्य आणि समाजाने एकजुटीने त्याला पहलगामध्ये हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिल्याचंही सरसंघचालकांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आपली सुरक्षा अधिक मजबूत करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारधोरणांवर भाष्य करताना भागवत यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा उल्लेख केलाय. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका संपूर्ण जगाला बसलाय. अशा वेळी भारताने स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारणे अपरिहार्य आहे, असंही त्यांनी सुचवलंय.
सरसंघचालकांनी कुटुंब आणि समाजव्यवस्थेचं महत्त्व अधोरेखित केलं. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांमुळे मानवी जीवन असंतुलित होतंय. या पार्श्वभूमीवर जगात कुटुंबव्यवस्था कोलमडली असली तरी भारतात ती टिकून आहे; ही परंपरा जपणं आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. हिमालयातील नैसर्गिक संकटांकडेही त्यांनी लक्ष वेधत पर्यावरणसंवर्धनाचं महत्त्व विषद केलंय. हिमालयाची स्थिती चिंताजनक असून विकासाच्या पद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे संरसंघचालक म्हणाले.
हिंदू समाजाच्या ऐक्यावर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलंय, कारण भारत प्राचीन हिंदू राष्ट्र आहे आणि मजबूत हिंदू समाज हीच राष्ट्रीय सुरक्षेची खरी हमी आहे, असं स्पष्ट मत मांडलंय. शेवटी भागवतांनी पुन्हा एकदा सात सामाजिक पापांची आठवण करून दिलीय. त्यामध्ये परिश्रमाशिवाय काम, विवेकाशिवाय आनंद, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, बलिदानाशिवाय धर्म आणि सिद्धांताशिवाय राजकारण याची आठवण करून दिलीय. कारण हीच समाजातील असमतोलाची खरी कारणं आहेत, असं स्पष्ट भूमिका संरघचालक मोहन भागवत यांनी मांडलीय.
एकूणच विजयादशमीच्या मंचावरून संरसंघचालकांनी एकाच वेळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा ऊहापोह केलाय. स्वदेशी, आत्मनिर्भरता, समाजव्यवस्थेची जपणूक आणि हिंदू समाजाच्या एकतेवर त्यांनी भर दिलाय. नागपूरच्या या भाषणातून येणाऱ्या काळासाठी संघाचे मार्गदर्शन स्पष्टपणे दिसून आलंय.