रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस
मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प करत सन २०२३ पासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, रेबीज नियंत्रणासाठी श्वानांच्या लसीकरणावर भर देणाऱ्या महापालिका आरोग्य खात्याला श्वानांनी चावा घेतल्यानंतर त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसींच उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा आता श्वानांचीच अधिक काळजी असल्याचे दिसून येत आहे.
रेबीज आजार हा झूनॉटिक आजारांपैकी एक असून सर्वसामान्यतः श्वानामार्फत हा आजार संक्रमित होतो. रेबीज आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे, १०० टक्के टाळता येण्यासारखा आहे. दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड रेबीज डे' साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट रेबीजविषयी जनजागृती करणे आणि 'वन हेल्थ' दृष्टिकोनातून या रोगाच्या नियंत्रणातील प्रगती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र, एका बाजुला श्वानांच्यी लसीकरणावर भर दिला जात असला तरी भटक्या श्वानांनी चावा घेतल्यास त्यावर उपाय म्हणून रेबीज प्रतिबंधक लसचा तुटवडा मोठ्याप्रमाणात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये निर्माण झाला आहे. रेबीजच लसींच्या पुरवठ्याची प्रक्रियाच थांबल्याने सध्या कुठल्याही रुग्णालयांमध्ये या लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर या लसी खरेदी केल्या जात आहेत. महापालिकेच्यावतीने रेबीज लसींच्या खरेदीला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात नियुक्त कंपनीलाच कार्यादेश न दिल्यामुळे अद्यापही याची खरेदीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिक दराने लसींची खरेदी केली जात आहे. ज्यामध्ये लसींची खरेदी अधिक दराने केली जात असल्याने महापालिकेच्या तिजोरीवरील भार वाढत चालला असून लस तातडीने उपलब्ध होत नसल्याने रग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन आणण्यास भाग पाडले जाते.
श्वान दंश लसीकरण कार्यक्रमांतंर्गत मुंबईत एकूण १४६ श्वानदंश लसीकरण केंद्र आणि ८४ आपला दवाखाना याठिकाणी भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यात येते. यापूर्वी महापालिकेने खरेदी केलेल्या लसींचे कंत्राट मार्च २०२४ रोजी संपुष्टात आल्यानंतर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने स्थानिक पातळीवर याची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांसाठी या लसींची खरेदी केली जात असून शेवटची खरेदी ही मे आणि जून २०२५ या महिन्यांकरता १८००० लसींची केली होती.
महापालिकेला मासिक १२ हजार रेबिज प्रतिबंधात्मक लसींची आवश्यकता असते. त्यामुळे यापूर्वी खरेदी करूनही विविध केंद्रात पुरवठा केलेल्या या लसींचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे अनेक ठिकाणी श्वानांनी चावा घेतल्यानंतर महापालिकेच्या केंद्रात आणि आपला दवाखान्यात आलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने माघारी जावे लागते किंवा नागरिकांना बाहेरुन आणून दिल्यास त्याचे लसीकरण करून दिले जात असल्याची माहिती मिळत आहे.