मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे त्याबाबत सामूहिक धोरण तयार करू आणि राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. ओला दुष्काळ कुठेही नाही, शिवाय आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही; परंतु ओला दुष्काळ पडल्यानंतर ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत सातत्याने महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला. जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले त्यासाठी २ हजार २१५ कोटी रुपये राज्य सरकारने वितरीत करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट रद्द करून शेत नोंदीप्रमाणेच ही मदत होईल. पुढच्या २-३ दिवसांत सगळ्या प्रकारची माहिती आमच्याकडे पोहोचेल.
काही ठिकाणी पाणी असल्याने योग्य आकडेवारी घेता येत नव्हती. तिथे आपण अधिकचा वेळ दिला आहे. २-३ दिवसांत ही माहिती पोहोचेल, त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत, जमीन खरडून गेलेली असेल त्याकरिता मदत, विहिरींसाठी मदत, घरांची मदत असेल अशा वेगवेगळ्या
नुकसानीबाबत सर्वसमावेशक धोरण आखून आम्ही मदत करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
तसेच सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मिळाली पाहिजे, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होते; परंतु धोरणात कुठेही ओला दुष्काळाचा उल्लेख नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र ज्या वेळी दुष्काळ पडतो, तेव्हा ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो, त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
नुकसानाची आकडेवारी जमा झाल्यानंतर लवकरात लवकर याबाबत मदतीची घोषणा करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीने राज्याच्या ग्रामीण भागाचे, शेतीचे, शेतातील पिकांचे खूप नुकसान झाले आहे.
संपूर्ण माहिती मिळाल्यावर दिल्लीला प्रस्ताव पाठवणार
दिल्लीतून आपल्याला पूर्ण मदत होणार आहे. त्यासाठी आपला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर एक प्रस्ताव पाठवला जाईल; परंतु दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता लागेल ती मदत आपण देतोय, त्याची भरपाई दिल्लीतून नंतर केली जाईल, असेही केंद्र सरकारच्या मदतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याऱ्यांना आणि जनतेला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे विभागाने गतीने कार्यवाही सुरू केली आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव श्रीगती विनिता सिंघल यांनी सांगितले. पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यावर विभागाचा भर आहे, असेही प्रधान सचिव श्रीमती सिंघल यांनी सांगितले.