सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाही सीमोल्लंघन सोहळ्यासाठी मिळणारा शासकीय निधी थेट मदतकार्याला वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात विशेषतः मराठवाडा, कोकण, तसेच साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातले असून, अनेक भागांत पिकांचे, घरेदारे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक थाटात साजरा होणारा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणात पार पडणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या शाही सोहळ्यासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे माहिती देताना सांगितले की, "राज्यातील पूरग्रस्त जनतेची अवस्था अतिशय गंभीर असून, अशा वेळी थाटामाटात सोहळा साजरा करणं आमच्या मनाला पटणारे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे."
त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये आर्थिक, वस्तू किंवा धान्य स्वरूपात शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ही मदत पोहोचवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदयनराजेंनी राजघराण्याच्या सामाजिक बांधिलकीचे भान जपत हा निर्णय घेतला असून, संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागांमध्ये मदतीची तीव्र गरज असल्याने, प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीनं पुढे येणं गरजेचं आहे, असा भावनिक संदेशही त्यांनी दिला आहे.