मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषक २०२५ ही टी २० क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारताने सलग नवव्यांदा आशिया चषक जिंकला. यंदा भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. भारताने पाकिस्तान विरुद्धचा अंतिम सामना पाच विकेट राखून जिंकला. भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत, सुपर फोर फेरीत आणि अंतिम फेरीत असे तीन वेळा पाकिस्तानला हरवले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला आणि स्पर्धा जिंकली. या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने भारतीय संघाला २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम क्रिकेटपटू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, संघ व्यवस्थापनातील अधिकारी या सर्वांमध्ये वाटली जाणार आहे.
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करुन अतिरेक्यांचे तळ नष्ट केले. भारताच्या कारवाईला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. पाकिस्तानच्या या प्रयत्नाला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या निवडक हवाई तळांवर हल्ला केला. या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर एशिया कप स्पर्धा झाली. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची तयारी भारताने केली. तणावपूर्ण वातावरणात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. तणावाचा परिणाम स्पर्धेतील भारत - पाकिस्तान दरम्यानच्या तिन्ही सामन्यांवर दिसून आला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले. स्पर्धा जिंकल्यानंतरही भारताने एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष असलेल्या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
मैदानात भारतीय क्रिकेटपटूंनी पुरस्कार स्वीकारत असल्याचा अभिनय केला. पण पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांकडून एशिया कप स्वीकारणे टाळले. यानंतर खेळाडूंनी हातात एशिया कप असल्याचा अभिनय करत फोटोसाठी पोझ दिल्या. हा प्रकार सोशल मीडियात चर्चेचा विषय झाला. देशभरातून भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक झाले. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक एक्स पोस्ट व्हायरल झाली. क्रिकेटच्या मैदानातील ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. यानंतर काही तासांनी बीसीसीआयची एक एक्स पोस्ट व्हायरल झाली. तीन दणके, शून्य प्रतिसाद, आशिया कप चॅम्पियन्स, संदेश पोहोचवला अशी सूचक पोस्ट करत बीसीसीआयने तिरंगा इमोजीचा वापर केला. दबावाखाली आणि तणावपूर्ण वातावरणा भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचे बीसीसीआयने कौतुक केले.
भारताने आतापर्यंत जिंकलेल्या आशिया चषक स्पर्धा : १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८, २०२३, २०२५