मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. नव्या अभ्यासक्रमाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार होती. पण राज्यातील काही जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी होणार असलेली एमपीएससीची परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे प्रामुख्याने पुराचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात २८ सप्टेंबर रोजी होणार असलेल्या इतर परीक्षांचेही नवे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी एक लाख ७५ हजार ५१६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्याच्या काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पुराचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी केंद्रावर येण्याकरिता मोठे दिव्य करावे लागेल. यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २८ सप्टेंबर रोजी होणार असलेली एमपीएससीची परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.