पंतप्रधान मोदी यांचे स्वाबलंबी बनण्याचे आवाहन; नोएडात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन
नोएडा : देशातील व्यावसायिकांना चिप्सपासून ते जहाजापर्यंत सर्व काही भारतातच तयार करायचे आहे. तुमचे व्यवसाय मॉडेल अशा प्रकारे विकसित करा, जे स्वावलंबी भारताच्या उद्देशाला बळकटी देईल. या बदलत्या जगात एखादा देश जितका इतरांवर अवलंबून असेल तितकाच त्याचा विकास धोक्यात येईल. त्यामुळे भारताला आता कोणावरही अवलंबून राहणे परवडणारे नाही. भारताने स्वावलंबी बनले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोचे उद्घाटन केले. हे व्यापार प्रदर्शन २९ सप्टेंबरपर्यंत चालेल. रशिया आपला भागीदार देश म्हणून सहभागी होत आहे. यावर्षीच्या व्यापार प्रदर्शनातून ५,००० कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज आहे. पहिल्यांदाच, या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेलचा लाईव्ह डेमो आयोजित केला जाईल. उत्तर प्रदेशातील ४० जिल्ह्यांतील उत्पादने जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित केली जात आहेत. २ हजार ४०० हून अधिक स्टॉल उभारण्यात आले असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आतापर्यंत, भारत सरकारने जेमद्वारे ₹१५ लाख कोटींच्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्या आहेत. मागील सरकारांच्या काळात हे अकल्पनीय होते; परंतु आज, देशाच्या एका दुर्गम कोपऱ्यात राहणारा एक लहान व्यवसाय मालक जेम पोर्टलवर वस्तू विकत आहे.
देशातील ५५% मोबाइल फोनची उत्तर प्रदेशात निर्मिती
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारतात उत्पादित होणारे ५५ टक्के मोबाइल फोन उत्तर प्रदेशात बनवले जातात. उत्तर प्रदेश आता सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारताची स्वावलंबनता मजबूत करेल. काही किलोमीटर अंतरावर एका मोठ्या सेमीकंडक्टर सुविधेवर काम सुरू होणार आहे.मी तुम्हा सर्वांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आणि येथे उत्पादन करण्याचे आवाहन करतो. उत्तर प्रदेशात लाखो एमएसएमईंचे मजबूत नेटवर्क आहे. आपण भारतात बनवू शकणारे प्रत्येक उत्पादन येथेच तयार केले पाहिजे. आज माझ्यासमोर अनेक उद्योजक आहेत. तुम्ही स्वावलंबी भारताचे प्रमुख भागधारक आहात. आम्ही तुम्हाला तुमचा व्यवसाय मॉडेल अशा प्रकारे विकसित करण्याचा आग्रह करतो की जो स्वावलंबी भारताला बळकटी देईल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सरकार मेक इन इंडियावर किती भर देत आहे. आम्हाला चिप्सपासून जहाजांपर्यंत सर्व काही भारतातच तयार करायचे आहे.
एक हजार रुपयांच्या शर्टवर ३५ रुपये कर आकारला जाईल
मोदी म्हणाले की, नवीन जीएसटी दरांमुळे भारताच्या विकासाची गती वाढेल. ते जीएसटी नोंदणी सुलभ करतील, कर विवाद कमी करतील आणि एमएसएमईसाठी जलद परतावा सुनिश्चित करतील. २०१४ पूर्वी इतके कर होते की व्यवसाय खर्च आणि कुटुंब बजेट कधीही संतुलित होत नव्हते. २०१४ पूर्वी, १,००० रुपयांच्या शर्टवर ११७ रुपये कर आकारला जात होता. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर, हा कर ५० रुपये करण्यात आला. आता, नवीन जीएसटी सुधारणांसह, १,००० रुपयांच्या शर्टवर फक्त ३५ रुपये लागतील.