सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियात भरपूर चर्चा सुरू आहे. नवरात्रीत दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. 'आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, तर हिंदवी स्वराज्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती. त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो. आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे'; असे संभाजी भिडे म्हणाले.
संभाजी भिडे भारताचे संविधान या विषयावरही बोलले. 'आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. आणि लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे'; असे संभाजी भिडे म्हणाले.
याआधीही संभाजी भिडे यांनी केलेली काही वक्तव्य चर्चेचा विषय झाली आहेत. सर्वधर्म समभाव हा ना धड स्त्री ना धड पुरुष असा प्रकार आहे. म्हणजे निव्वळ नपुंसकपणा. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे, पण ते शक्य आहे का? तर नाही. म्हणून सर्वधर्म समभाव हा निचपणा आहे, असे संभाजी भिडे म्हणाले होते. आंबे खाऊन मूलं होतात असे मी एकदा म्हणालो होतो. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे. मी एक आंब्याचे झाड लावले आहे. तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता; असेही संभाजी भिडे म्हणाले होते.