मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला असून, नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या "बॅड्स ऑफ बॉलिवूड" (The Badass of Bollywood) या वेब सीरिजमुळे आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांनी अभिनेता आर्यन खान दिग्दर्शित आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेतील भूमिकेबद्दल शाहरुख खान आणि नेटफ्लिक्स विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या कंपनीकडून २ कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे.
समीर वानखेडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचा उद्देश कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश मिळवणे, घोषणा करणे आणि झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळवणे हा आहे.
वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, रेड चिलीज एंटरटेनमेंटने तयार केलेल्या आणि नेटफ्लिक्सने प्रसारित केलेल्या "बॅड्स ऑफ बॉलिवूड" या मालिकेच्या एका भागात अत्यंत चुकीचे, बदनामीकारक आणि दुर्भावनापूर्ण चित्रण करण्यात आले आहे. यामुळे त्यांची प्रतिमा समाजात आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात मलिन झाली आहे. ही वेब सीरिज त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम करत असल्याचा त्यांचा दावा आहे.
हा खटला केवळ नुकसान भरपाईसाठी नसून, भविष्यात अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा विनाकारण मलिन केली जाऊ नये यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे.
या प्रकरणाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, कारण यामुळे मनोरंजन उद्योग आणि कायद्याच्या चौकटीत व्यक्तीच्या मान-सन्मानाची मर्यादा कशी असावी, याबाबत नवीन चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.