‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार
मुंबई : नगरविकास विभागाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२५’ सुरू असून याअंतर्गत राज्यातील अस्वच्छ असलेल्या सुमारे २० हजार ४४६ ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करून त्या ठिकाणांचे परिवर्तन करणे, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, स्वच्छ हरित महोत्सव आणि स्वच्छता पुरस्कार या उपक्रमांचा समावेश आहे.
या अभियानाअंतर्गत गुरुवारी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाअंतर्गत सकाळी ८.०० वा. लोकांच्या सहभागाने सामूहिक स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेट्रो सिनेमा ते ईएनटी रुग्णालय मार्गावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात राज्यातील २०,४४६ ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून आजपर्यंत त्यातील सुमारे ६,०८२ ठिकाणे स्वच्छ करण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानात जनसहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सफाई मित्रांसाठी ४०६ सुरक्षा शिबिरे घेण्यात येणार आहेत. तसेच २,१७३ ठिकाणी स्वच्छ हरित महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.