नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान; नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार
मुंबई : डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत २५ सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातून देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती महिना (CSAM) 2025 राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, तसेच गृहमंत्रालय, क्रेट-इन (CERT-In), सेबी (SEBI) आणि बीएसई (BSE) यांचे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
हे अभियान गृह मंत्रालयाच्या इंडिया सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, क्रेट-इन (CERT-In) यांच्या सहकार्याने राबवले जात असून, उद्योगक्षेत्रातील भागीदार संस्थांनी या उपक्रमात योगदान दिले आहे.
हे अभियान नागरिक, संस्था व भागधारकांना सायबर सुरक्षिततेच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास, सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर, वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती दिली जाईल आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.