तीन एकदिवसीय मालिकेत भारताची १-० ने आघाडी
नवी दिल्ली : भारत १९ वर्षांखालील संघ आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह, भारतीय १९ वर्षांखालील संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामने आणि दोन युवा कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने झाली आहे.
ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाने आपले दोन्ही सलामीवीर फक्त १ धावा स्कोअर बोर्डवर असताना गमावले. अॅलेक्स टर्नर (०) आणि सायमन बज (०) ० धावांवर माघारी गेले. त्यानंतर स्टीव्हन होगन आणि विल मलाजचुक यांनी ३३ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला.
मात्र, विल मलाजचुक जास्त काळ मैदानावर तग धरू शकला नाही. तो १७ धावांवर असताना माघारी गेला. त्यानंतर यश देशमुख ३५ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने फक्त ३५ धावांवर आपल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतर टॉम होगन आणि स्टीव्हन होगन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलिया डाव सावरला.
स्टीवन देखील ३९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर टॉमने ४१ धावांची खेळी करून माघारी परतला. त्यानंतर आर्यन शर्मा १९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर जॉन जेम्सने नाबाद ७७ धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २०० च्या पार नेण्यात यश मिळवले. बेन गॉर्डननेही १६ धावा केल्या. जॉन जेम्सच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघ २२५ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून गोलंदाजीमध्ये हेनिल पटेलने तीन, किशन कुमारने दोन आणि कनिष्क चौहानने दोन बळी टिपले आणि यजमान संघाला ९ बाद २२५ धावांवर रोखले. भारतीय गोलंदाजांमध्ये हेनिल पटेलने शानदार कामगिरी केली. त्याने ३ बळी घेतले. किशन कुमार आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आरएस अम्ब्रिसला एक यश मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना, वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या जोडीने भारतीय डावाची सुरुवात दमदार केली. वैभव आणि कर्णधाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना फटकारले. त्यांनी मिळून फक्त चार षटकांत ४५ धावा फटकावल्या.
वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या षटकात तीन शानदार चौकार मारले. त्यानंतर, चौथ्या षटकात, त्याने एका षटकारासह सलग तीन चौकार मारून ऑस्ट्रेलियन संघाला धक्का दिला. चौथ्या षटकाच्या अखेरीस, वैभवने फक्त २२ चेंडूत ३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेडन शिलर पुढचा षटक टाकण्यासाठी आला, पाचव्या षटकात वैभवने धावांची भरभराट करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु नियतीच्या मनात वेगळेच नियोजन होते. कर्णधार आयुषने षटकातील पहिल्या पाच चेंडूंचा सामना केला, नंतर वैभवला स्ट्राईक सोपवला. शेवटच्या चेंडूवर हेडन शिलरने एक शानदार चेंडू टाकला आणि वैभव सूर्यवंशीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशा प्रकारे, स्टार फलंदाजाची स्फोटक धावसंख्या संपुष्टात आली. त्यानंतर आयुष म्हात्रे ६ धावांकरून बाद झाला. विहान मल्होत्राही ९ धावांवर झटपट माघारी परतला.
वेदांत, अभिज्ञान स्फोटक फलंदाजी
वेदांतने ६९ चेंडूंचा सामना करत नाबाद ६१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार लगावले. तर अभिज्ञानने ७४ चेंडूंचा सामना करत नाबाद ८७ धावा चोपल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ५ षटकारांची आतिषबाजी केली आणि संघाला सामना जिंकून दिला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून चार्ल्स लॅचमुंडने सर्वाधिक २ विकेट घेतल्या आणि हेडन सिलचरने १ विकेट घेतली.
वैभव सूर्यवंशीचा तडाखा
१४ वर्षीय वैभवने २२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार मारत ३८ धावांची जलद खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट १७२.७३ होता. त्याने फक्त २४ मिनिटे क्रीजवर घालवली, परंतु त्याच्या स्फोटक फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या सामन्यात वैभवची फलंदाजी प्रभावी नसली तरी, त्याच्याकडे अजूनही त्याची प्रतिभा दाखविण्याची उत्तम संधी आहे. एकदिवसीय मालिकेतील पुढील दोन सामन्यांमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारण्याची उत्तम संधी असेल.