भागिदारी वाढवली, तेल निर्यात सुरू
नवी मुंबई : पाकिस्तानचा खास मित्र अझरबैजान देशाने भारतासोबत मैत्री अधिक केली आहे. दरम्यान अझरबैजानने भारताला कच्च्या तेलाचा निर्यात पुन्हा सुरू केला आहे. ही निर्यात १० महिन्यांपूर्वी बंद झाली होती. आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. तेल किमतीवरून काही समस्या होती, ती आता मिटली आहे. पाकची साथ देणाऱ्या अझरबैजान या देशाला भारताचे व्यापारी महत्त्व समजल्याचे दिसून येत आहे.
अझरबैजानच्या कस्टम विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात अझरबैजानने भारताला १७४७.०७ टन कच्चे तेल पाठवले. याची किंमत ७,८१,५२० डॉलर्स इतकी होती. ऊर्जा क्षेत्रातला सहयोग हा दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांचा महत्त्वाचा भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये भारत, अझरबैजानकडून पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणारा चौथा सर्वात मोठा देश होता. भारताने जवळपास ७२९ मिलियन डॉलर्सचे १.१७ मिलियन टन सामान खरेदी केले. २०२२ आणि २०२३ मध्ये भारत तिसरा सर्वांत मोठा खरेदीदार होता. त्यावेळी भारताने दरवर्षी २ मिलियन टनांपेक्षा जास्त सामान खरेदी केले होते, ज्याची किंमत अनुक्रमे १.६ बिलियन डॉलर्स आणि १.२ बिलियन डॉलर्स होती.
भारताची गुंतवणूक
भारताने अझरबैजानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासोबतच, भारत अझरबैजानमध्ये मोठा गुंतवणूकदारही आहे. बाकू येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ONGC Videsh Ltd ने अजेरी-चिराग-गुनाशली तेल आणि वायू क्षेत्रात आणि बाकू-त्बिलिसी-सेहान तेल पाइपलाइनमध्ये भागीदारी घेण्यासाठी १.२ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. भारताने या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. २०२४ मध्ये OVL ने इक्विनोरकडून एसीजी तेल आणि वायू क्षेत्रात ०.६१५% अतिरिक्त भागीदारी खरेदी केली. यासाठी OVL ने ६० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. या करारामध्ये बीटीसी पाइपलाइनमधील इक्विनोरचे ०.७३७% शेअर्सदेखील होते. इक्विनोरकडून खरेदी केल्यानंतर एसीजी तेल आणि वायू क्षेत्रात OVL ची भागीदारी २.९२५% आणि बीटीसी पाइपलाइनमध्ये ३.०९७% झाली आहे.
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकला साथ
यावर्षी मे महिन्यात भारताने पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई केली होती. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला साथ दिली होती.
पाकिस्तान आणि अझरबैजान हे चांगले मित्र आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अझरबैजानने काही विधाने केली होती, जी भारताच्या विरोधात होती. अझरबैजानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले होते, "आम्ही त्या लष्करी हल्ल्यांचा निषेध करतो, ज्यात पाकिस्तानमध्ये अनेक नागरिकांचा जीव गेला आणि अनेक लोक जखमी झाले. ’’