Friday, September 19, 2025

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मोहम्मद निजामुद्दीन पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता.

हाती आलेल्या वृत्तानुसार मोहम्मद निजामुद्दीन सांताक्लारामध्ये एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत शिक्षण घेत होता. तो भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. या घरात त्याच्या सोबत वास्तव्यास असलेल्या रूममेटचा आणि मोहम्मद निजामुद्दीनचा वाद झाला. शा‍ब्दिक चर्चा झटापटीपर्यंत पोहोचली. घरातच चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेत मोहम्मद निजामुद्दीनचा रूममेट ठार झाला. घटनेनंतर थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी हातात चाकू घेतलेल्या मोहम्मद निजामुद्दीनला बघितले. यावेळी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही म्हणून केलेल्या गोळीबारात मोहम्मद निजामुद्दीनचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्याच परिसरातील काही जणांनी थोडी वेगळीच माहिती दिली. स्वतः मोहम्मद निजामुद्दीनने पोलिसांना फोन केला होता पण पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर जास्त चौकशी करण्याऐवजी लगेच गोळीबार केला ज्यात मोहम्मद निजामुद्दीनचा मृत्यू झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोहम्मद निजामुद्दीन प्रकरणात वेगवेगळी माहिती येत असल्यामुळे त्याचे पालक संभ्रमात आहेत. त्यांनी या प्रकरणी सखोल तपासाची मागणी केली आहे. सध्या मोहम्मद निजामुद्दीनचे पालक त्याचा मृतदेह भारतात कधी येतो ? याची वाट बघत आहेत. आमचा मुलगा शांत स्वभावाचा होता तो कोणाशी मारामारी करण्याची किंवा कोणावर हल्ला करण्याची शक्यता नाही, असे मोहम्मद निजामुद्दीनचे वडील निवृत्त शिक्षक हुसनुद्दीन म्हणाले.

Comments
Add Comment