Saturday, May 9, 2026

Delhi Red Fort Blast : फरीदाबाद ते लाल किल्ला : अटकेच्या धाकाने डॉ. उमर मोहम्मदने उडवली स्वतःचीच कार; तपासात धक्कादायक माहिती उघड

Delhi Red Fort Blast : फरीदाबाद ते लाल किल्ला : अटकेच्या धाकाने डॉ. उमर मोहम्मदने उडवली स्वतःचीच कार; तपासात धक्कादायक माहिती उघड

'आत्मघातकी' हल्ल्याचा संशय, फरिदाबाद कनेक्शन उघड

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेला स्फोट (Delhi Red Fort Blast) हा दहशतवादी हल्ला असल्याचे तपास यंत्रणांना वाटत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून, तपास यंत्रणांना मोठे आव्हान उभे राहिले आहे. या हल्ल्यात झालेली जीवितहानी चिंताजनक आहे. आतापर्यंत या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणांच्या मते, हा हल्ला अत्यंत क्रूरपणे करण्यात आला आहे. स्फोटके एका कारमध्ये ठेवण्यात आली होती आणि त्याच कारमध्ये स्फोट झाला. यंत्रणांना हा हल्ला आत्मघातकी (Suicide Attack) असण्याचा तीव्र संशय आहे. या स्फोटामागील कटाचा तपास करताना तपास यंत्रणांना एक महत्त्वाचा दुवा मिळाला आहे. आतापर्यंतच्या तपासात या दिल्ली लाल किल्ला स्फोटाचा थेट संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी असल्याचे समोर आले आहे. फरिदाबादमध्ये यापूर्वीच काही संशयितांना अटक करण्यात आली होती, त्यामुळे हे दोन्ही कट एकमेकांशी जोडलेले असण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा आता स्फोटकांचे स्वरूप, आत्मघातकी हल्लेखोर आणि या कटामागील सूत्रधार कोण आहेत, याचा कसून शोध घेत आहेत.

कारमधील मृतदेहाची होणार DNA चाचणी होणार

तपास यंत्रणांना स्फोट झालेल्या कारमध्ये एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी आता डीएनए चाचणी (DNA Test) करण्याचा निर्णय घेतला आहे. गुप्तचर यंत्रणांना तीव्र संशय आहे की, i२० कारमधील ही व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद असू शकते. फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी कनेक्शन असलेल्या डॉ. उमर मोहम्मद याचा शोध दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्रणा घेत होत्या. फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट (Explosive) जप्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कारवायांबद्दल माहिती मिळाली होती. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामध्ये स्फोटाच्या आधी काळा मास्क घातलेला एक संशयित व्यक्ती दिसत आहे. हा व्यक्ती डॉ. उमर मोहम्मदच आहे का, याचीही तपासणी सुरू आहे. डीएनए चाचणीच्या निकालातून स्फोटामागील प्रमुख व्यक्ती आणि या दहशतवादी कटाचा मुख्य दुवा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

डॉ. उमर मोहम्मदने दोन साथीदारांसह रचला हल्ल्याचा कट.

स्फोटात ठार झालेला व्यक्ती हा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील फरार डॉक्टर उमर मोहम्मद (Dr. Umar Mohammad) असण्याची शक्यता बळावली आहे. एका हिंदी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटावेळी दहशतवादी उमर मोहम्मद हा कारमध्येच उपस्थित होता. डॉ. उमर मोहम्मद याच्या अटकेसाठी जम्मू-काश्मीर पोलीस आणि फरिदाबाद पोलीस सोमवारी दुपारी १ वाजल्यापासून सक्रिय झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये जलद अटकसत्र सुरू झाल्यामुळे अटकेच्या भीतीने डॉ. मोहम्मद घाबरला. या घाबरलेल्या अवस्थेत त्याने आणि त्याच्या इतर दोन सहकारी दहशतवाद्यांसह मिळून तातडीने दहशतवादी हल्ल्याची योजना आखली. त्याने साथीदारांच्या मदतीने कारमध्ये डिटोनेटर (Detonator) ठेवले आणि स्फोट घडवून आणला. दिल्ली पोलिसांनी स्फोटासाठी वापरलेल्या i२० कारच्या मार्गाचे सीसीटीव्ही मॅपिंग (CCTV Mapping) केले आहे, ज्यामुळे कार लाल किल्ल्यापर्यंत कशी पोहोचली याचा संपूर्ण मार्ग स्पष्ट झाला आहे. या अहवालानुसार, i२० कार शेवटची बदरपूर सीमेवर दिसली होती आणि तिथून ती दिल्लीत दाखल झाली. यानंतर पोलिसांनी पुढील मार्ग निश्चित केला, त्यानुसार ही कार थेट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पोहोचली. पोलिसांना डॉ. उमर मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांच्या कटाची योजना तसेच त्यासाठी वापरलेले मार्ग स्पष्ट झाले असून, तपास यंत्रणा आता त्याच्या दोन्ही सहकारी दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत.

लाल किल्ला स्फोटात i२० कारचे 'जम्मू-काश्मीर' कनेक्शन

आय-२० कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची होती. त्याने ती नदीमला विकली. नदीमने ती कार फरीदाबाद येथील रॉयल कार झोन या कार डीलरला विकली. त्यानंतर तारिकने ती खरेदी केली. त्यानंतर, ती उमरने घेतली होती. ही कार हरियाणातील गुरुग्राम उत्तर आरटीओमध्ये नोंदणीकृत होती. तिचा क्रमांक एचआर २६ ७६२४ होता आणि ती मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. काल रात्री पुलवामातील सांबुरा येथे पोलिसांनी तारिकला ताब्यात घेतले, कारचा आरसी तारिकच्या नावावर नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तारिकने २०१५ मध्ये उमरला कार दिली होती तोपर्यंत ही गाडी तारिकच्या नावावर होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या व्यवहारात आमिर नावाचा एक माणूस सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिस तारिक आणि आमिरची चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी स्फोटाची माहिती देताना सांगितले की, ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये तीन जण होते. हा आत्मघातकी हल्ला होता का याचा तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. "हा स्फोट चालत्या हुंडई आय-२० कारमध्ये झाला, ज्यामध्ये तीन लोक बसले होते. आम्हाला जखमींच्या शरीरात कोणतेही श्रापनेल किंवा पंक्चर आढळले नाहीत, जे स्फोटात असामान्य आहे. आम्ही सर्व पैलूंची चौकशी करत आहोत," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

कार मालक 'मोहम्मद सलमान' ताब्यात

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान याला संध्याकाळी उशिरा ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून गाडीबद्दल कसून चौकशी करण्यात आली. सलमानने पोलिसांना सांगितले की, त्याने सुमारे दीड वर्षांपूर्वी ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर हे वाहन अंबाला येथील एका व्यक्तीला आणि पुढे पुलवामातील तारिक नावाच्या व्यक्तीला विकले गेले होते. पोलीस आता या साखळीतील पुढील व्यक्तींचा तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी या स्फोटाप्रकरणी गंभीर स्वरूपाचा एफआयआर (FIR) नोंदवला आहे. या घटनेमागील दहशतवादी कट लक्षात घेता, एफआयआरमध्ये कठोर कलमे जोडण्यात आली आहेत. दहशतवादी कृत्ये आणि त्यांच्या शिक्षेशी संबंधित कलम १६ आणि १८ (जे सहसा UAPA अंतर्गत असतात) जोडण्यात आले आहेत. स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ३ आणि ४ सह खून आणि हत्येचा प्रयत्न करण्याचे गंभीर कलम देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याने तपास यंत्रणांनी या स्फोटाला दहशतवादी हल्ला मानल्याचे स्पष्ट झाले आहे.

लाल किल्ला स्फोटाचे थेट फरिदाबाद कनेक्शन

तपासातून असे दिसून आले आहे की, या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभागी असलेले संशयित आरोपी जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अन्सार गजवत-उल-हिंद (AGUH) यांसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते आणि त्यांच्या इशाऱ्यावर काम करत होते. या मॉड्यूलचे सर्वात धक्कादायक स्वरूप म्हणजे यात दोन पुरुष आणि एक महिला डॉक्टर देखील सहभागी होते. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या काही प्रमुख आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत, डॉ. मुझम्मिल अहमद गनई (फरीदाबाद), डॉ. आदिल अहमद राथेर (पुलवामा), डॉ. शाहीन शाहिद (लखनऊ), या स्फोटासंदर्भात तपास यंत्रणा दहशतवादी डॉ. मोहम्मद उमर (Dr. Mohammad Umar) याचा कसून शोध घेत आहेत, जो स्फोटावेळी कारमध्येच होता. या कारवाईत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २,९०० किलो स्फोटके, मोठा शस्त्रांचा साठा आणि अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रचंड स्फोटकांच्या साठ्यामुळे, हे मॉड्यूल देशात मोठे घातपात घडवण्याच्या तयारीत होते, हे स्पष्ट होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा