धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी सद्यस्थितीला कांदा विक्री न करता साठवणूक करून ठेवत आहे. मात्र शेडमध्ये साठवणूक करून ठेवलेला कांदा देखील आता सडू लागला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.
अर्थात एकीकडे भाव नाही तर दुसरीकडे कांदा खराब होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल; या आशेपोटी शेतकरी दिनेश पाटील यांनी चार महिन्यापासून १०० क्विंटल पेक्षा जास्त कांदा शेडमध्ये साठवून ठेवला होता. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यापासून कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे कांदा शेडमध्येच खराब होण्यास सुरुवात झाली. यामुळे काही कांदा पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे मजबुरीने विक्री करावा लागला. परंतु त्यापेक्षा कांद्याला जास्तीचा दर मिळाला नाही आणि त्यामुळे उर्वरित कांदा चाळीमध्येच खराब होऊ लागला.
साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने २० ते २५ क्विंटल कांदा उकीरड्यावर फेकण्याची वेळ शेतकरी दिनेश पाटील यांच्यावर आली. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कांद्याला तीन हजार पर्यंतचा दर मिळत होता. या अपेक्षेनेच या वर्षी देखील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. मात्र पाचशे ते आठशेचा भाव कांद्याला मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.