अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल
शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डीत रोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर परिसरातील या भाविकांच्या लोंढ्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रकारचे व्यवसाय फुलतात.
मात्र या संधीचा गैरफायदा घेत काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी भिक्षा मागणे, प्रसाद-फुले विक्री किंवा गंध लावण्यासारख्या कामांसाठी रस्त्यावर उभे करतात. मुलांचे बालपण हिरावून घेणारी ही धक्कादायक वास्तवता उघडकीस आल्यानंतर अखेर शिर्डी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.
दरम्यान ११ सप्टेंबर रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १२ बालके (१० मुले व २ मुली) मंदिर परिसरात जबरदस्तीने भिक्षा व विक्रीस भाग पाडली जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पालकांकडूनच आपल्या लेकरांना क्रूर वागणूक देत रस्त्यावर उभे करण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८३/२०२५ नोंद करण्यात आला. हा गुन्हा बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत २०२१ अंतर्गत कलम ७५ व ७६ नुसार दाखल करण्यात आला आहे.
सदर बालकांना तातडीने बाल कल्याण समिती, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर व संगमनेर येथील बाल निरीक्षण गृहे येथे दाखल करण्यात आले असून त्यांचे पुनर्वसन व संरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे, कर्मचारी निवांत जाधव, सागर काळे, संदीप उदावंत, पंकज गोसावी, केवलसिंग राजपुत, किरण माळी, गजानन गायकवाड, विजय धनेधर, सोमेश गरदास, घोनशेटवाड तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी योगीराज अशोक जाधव, गिरीधर चौरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढे अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून भिक्षा मागवून घेणे अथवा विक्री करविणे आढळल्यास पालकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
शिर्डी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते समाजाला दिशा देणारे स्थान आहे. अशा पवित्र भूमीतच लहानग्यांचे बालपण रस्त्यावर उभे करून नासवले जात असेल, तर ही बाब संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद ठरते. मुलांच्या शिक्षणाऐवजी हातात प्रसादाची टोपली देणारे पालक प्रत्यक्षात त्यांच्या भविष्यावर गदा आणत आहेत. शिर्डी पोलिसांनी घेतलेले पाऊल ही केवळ कारवाई नसून, संपूर्ण समाजाला दिलेला धडा आहे की मुलांचे बालपण आणि शिक्षण हिरावणाऱ्यांविरुद्ध कायदा आता रस्त्यावर उतरणार आहे.
जिथे बाबांनी चिमुरडीसाठी पाण्यावर दिवे पेटविले… त्याच शिर्डीत आज लहानग्यांचे बालपण विझवले जातेय !
शिर्डीच्या इतिहासात असा एक प्रसंग आजही भक्तांच्या स्मरणात आहे. द्वारकामाईतील दिव्यांसाठी तेल न मिळाल्याने एका चिमुरडीचे डोळे पाणावले आणि साईनाथांनी तिच्या आसवांचे मोल देत पाण्यावर दिवे पेटवून दाखविले. हा प्रसंग म्हणजे बाबांच्या निरागस बालकांवरील अपार प्रेमाचे मूर्तीमंत उदाहरण. पण आजच्या शिर्डीत वास्तव अगदी उलट दिसते. मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी प्रसादाची टोपली, हार-फुलांचे गाठोडे, गंधाचा डबा देऊन पालक त्यांच्याकडून पैसे कमावण्याचा निर्लज्ज गोरखधंदा सुरू करत आहेत. मुलांच्या निरागस हास्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावर रस्त्यावर उभे राहण्याची लाचारी त्यांच्या भविष्याऐवजी तात्पुरता पैसा महत्त्वाचा ठरतोय. हे चित्र बाबांच्या करुणामयी स्मृतींना तडा देणारे आहे. साईनाथांनी ज्यांना आपल्या कुशीत घेऊन मायेचा साक्षात्कार करून दिला त्याच शिर्डीत आज बालपणाची लुट होत आहे हे दृश्य प्रत्येक साईभक्ताला चटका लावणारे आहे.