पीएमपीएमएल चालकांसाठी महत्त्वाची बातमी
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये बसचालकाला ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी PMPML प्रशासनाने सर्व चालकांना जबाबदारीपूर्वक बस चालवण्याचे आणि नियम काटेकोर पाळण्याचे आवाहन केले आहे.
पीएमपीएमएल बसचे काही चालक हे कानाला हेडफोन लावून बस चालवत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. या नियमभंगामुळे एक अपघातही झाला होता, त्यामुळे यावर रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Regional Transport Officer) आणि PMPML च्या संचालकांनी अशा चालकांच्या असुरक्षित वर्तनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
ड्यूटी संपेपर्यंत मोबाईल परत मिळणार नाही
PMPML प्रशासनाने दिलेल्या निर्णयानुसार बस चालकांना त्यांचा मोबाईल फोन कॉन्डक्टरकडे सुपूर्द करावा लागेल, आणि ड्यूटी संपेपर्यंत त्यांना मोबाईल परत मिळणार नाही. तसेच हा नियम पाळला नाही तर अशा चालकांचे त्वरित निलंबन केले जाणार आहे. हा आदेश PMPML अंतर्गत कार्यरत खाजगी बस कंत्राटदारांवर (Private Bus Contractors) ही लागू होतो. डिपो व्यवस्थापक (Depot Managers) याची काटेकोर दक्षता घ्यायला सांगितली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.