Thursday, September 18, 2025

Electronic Market: इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बुकिंग वाढले! जीएसटी कपातीमुळे ग्राहक उत्साहित, दसऱ्यात ऑफर्सचा भरणा

Electronic Market: इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बुकिंग वाढले! जीएसटी कपातीमुळे ग्राहक उत्साहित, दसऱ्यात ऑफर्सचा भरणा

Electronic Market: सरकारने जीएसटी कमी करून लोकांच्या खिशाला दिलासा दिला आहे. जीएसटी कमी केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मार्केट तेजीत आले आहे.  जो तो शोरूममध्ये जाऊन टीव्ही, फ्रीज तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बुकिंग करताना दिसून येत आहे.

सरकारने ४३ इंच आणि मोठ्या एलईडी टीव्ही आणि एअर कंडिशनरवर जीएसटी २८% वरून १८% करण्याची भेट दिल्याने इलेक्ट्रॉनिक्स मार्केट या दसऱ्याला चमकदार कामगिरी करणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दसऱ्यात विक्रीत २० ते २५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा विक्रेत्यांना आहे. जीएसटी कमी झाल्याची बातमी मिळताच ग्राहक दसऱ्याच्या निमित्ताने बुकिंगसाठी इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये धाव घेताना पाहायला मिळत आहे.

नवरात्रीच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा अधिक भर असतो. या काळात बाजार देखील अधिक तेजीत असतो, मात्र यंदा यात कमालीची वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे विक्रेते जीएसटी कपात ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी वरदान म्हणत आहेत. आतापर्यंत जीएसटीमुळे खरेदीसाठी सतत मागे राहणारे ग्राहक बाजारात येतील.  एसी, स्मार्ट टीव्ही, डिशवॉशरसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर जीएसटी कमी झाल्यामुळे ग्राहकांचे ४००० ते ५००० रुपये वाचणार आहे.

१०% सवलतीमुळे उत्साह वाढला

१०% सवलतीमुळे बाजारपेठेत उत्साह वाढला आहे, त्यामुळे येत्या दसऱ्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाईल असा अंदाज आहे. सध्या पितृपक्ष सुरू झाले आहे, त्यामुळे ग्राहक या काळात कोणतीही नवीन वस्तु किंवा व्यवहार करत नाहीत. सध्या ग्राहक त्यांच्या आवडत्या उत्पादनांचे बुकिंग करत आहेत, जेणेकरून नवीन जीएसटी लागू झाल्यानंतर होणारी गर्दी टाळता येईल. २२ सप्टेंबरनंतर शहरातील शोरूममध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात विक्रेते देखील आकर्षक सवलती देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील.

व्यापाऱ्यांच्या मते, काही लोक शुभ मुहूर्ताची वाट पाहतात, तर बहुतेक लोक खिशात पैसे असताना सण साजरा करतात. वित्त आणि उत्पादन कंपन्या देखील सणांच्या दिवशी नवीन योजना सुरू करतात. यामुळे लोकांना खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते.  सध्या बाजारात एलईडी टीव्हीला मोठी मागणी आहे, त्यामुळे यावर्षी एलईडी टीव्हीचा मोठा टर्न ओव्हर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >