प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकरांसह अन्य उमेदवारांची माघार
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमसीए’च्या बुधवारी (१२ नोव्हेंबर) होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकूण आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी (१० नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या अखेरच्या दिवशी अजिंक्य नाईक वगळता सर्वच उमेदवारांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे नाईक यांना ‘एमसीए’ अध्यक्ष म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणार हे स्पष्ट झाले.
‘एमसीए’ अध्यक्षपदासाठी नाईक यांच्यासह भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, भाजप आमदार प्रसाद लाड, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि मुंबई टी-२० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, ‘एमसीए’चे माजी सहसचिव शाह आलम शेख आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सुरज समत यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी नाईक वगळता सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले.
आ. जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. या पदासाठी त्यांच्यासमोर ठाण्याच्या यंग स्टार्स क्रिकेट क्लबकडून अर्ज दाखल केलेल्या नवीन शेट्टी यांचे आव्हान असेल.






