
मुंबई: लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री नव्या नायर हिला ऑस्ट्रेलियात एका साध्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ओणम सणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या नव्याला तिच्या हँडबॅगमध्ये सापडलेल्या चमेलीच्या फुलांमुळे मेलबर्न विमानतळावर तब्बल १,९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे १.१४ लाख रुपये)चा दंड ठोठावण्यात आला आहे.
नव्याने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी चमेलीचा गजरा विकत घेतला होता. तिने त्यातील एक भाग केसात माळला, पण तो सुकल्यावर दुसरा भाग एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून हँडबॅगमध्ये घेतला. ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, जैविक वस्तू किंवा वनस्पती सामग्री आणण्यास परवानगी नाही, याची तिला कल्पना नव्हती.
विमानतळावरील तपासणीदरम्यान ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाला तिच्या हँडबॅगमध्ये हा गजरा सापडला. यामुळे तिला लगेच दंड ठोठावण्यात आला. "मला माझी चूक कळली, पण ती जाणूनबुजून केलेली नव्हती. वडिलांनी दिलेल्या गजऱ्यामुळे मला दंड भरावा लागला, याचे वाईट वाटते," असे नव्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, रोग, कीटक किंवा जैविक असंतुलन टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वनस्पती, फुले किंवा बियांसारख्या वस्तू सरकारी परवानगीशिवाय देशात आणण्यास मनाई आहे. त्यामुळेच परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही घटना एक महत्त्वाचा धडा ठरली आहे.