मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा अलोट जनसागर उसळला आहे. अनंत चतुर्दशी संपली आणि रविवारची सकाळ उजाडली तरी लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप झालेले नाही. गणपतीची मूर्ती समुद्रात नेण्यात आली आहे. थोड्याच वेळात होणार लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा महाराजा यांसह इतर काही मंडळांचे बाप्पा विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचले आहेत. अने मंडळांची शेवटची आरती झाली आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. रविवार दुपारपर्यंत मुंबईतील सर्व गणपती विसर्जन पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवात आनंदाने सहभागी झालेल्या मुंबईकरांचा उत्साह विसर्जन मिरवणुकीतही कायम होता. पण समुद्रावर लाडक्या बाप्पााला निरोप देताना गणेशभक्तांना भावना अनावर झाल्या. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन रविवारच्या सकाळपर्यंत झाले होते. शनिवारी सकाळी मंडपातून सुरू झालेली लालबागच्या राजाची मिरवणूक रविवारी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. शेवटची आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाला विसर्जनासाठी समुद्रात नेण्यात आले. हजारो भाविकांनी समुद्रात उतरुन पोहत पोहत लाडक्या गणरायाला नमस्कार केला आणि साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.
अनंत अंबानींच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सदस्य अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक दिमाखात गिरगाव चौपाटीवर आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय गिरगाव चौपाटीवर पोहोचला.