१८ हजार पोलिसांचा बंदोबस्त, १० हजार कॅमेरे, ड्रोनची नजर अन् पहिल्यांदाच AI चं लक्ष; विसर्जनासाठी हायटेक मुंबई पोलीस सज्ज!

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईत उद्या (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही लाखो गणेशभक्त आपल्या आराध्य दैवताला विसर्जनासाठी घेऊन चौपाट्यांकडे रवाना होतील. विशेषत: दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थापनापासून ते गर्दीवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. आज सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गणपती विसर्जनाच्या दिवशी घेतलेल्या सुरक्षा उपाययोजना आणि वाहतूक नियोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली.



विसर्जनावेळी CCTV, ड्रोनची कडक नजर!


मुंबईत उद्या गणेश विसर्जनाचा महापर्व असल्याने वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी मुंबई पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे जवान शहराच्या विविध भागांत तैनात राहतील. गर्दीच्या ठिकाणी विशेष पथके, तर महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमले जाणार आहे. याशिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ड्रोनच्या सहाय्याने विसर्जन मिरवणुकींवर आणि गर्दीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नाकेबंदी, नियंत्रण कक्ष आणि तात्काळ कारवाईसाठी आपत्कालीन पथकेही सज्ज करण्यात आली आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्धास्तपणे बाप्पाच्या निरोप सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



पहिल्यांदाच मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात AI तंत्रज्ञानाचा वापर


मुंबईत यंदाच्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी अभूतपूर्व तयारी केली असून, प्रथमच बंदोबस्तात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा उपाय पूर्णत्वास गेले आहेत. घरगुती गणपतींपासून ते मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र नियोजन केले गेले आहे. गिरगाव चौपाटीसह विविध विसर्जन स्थळांवर बीएसमी दल, स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने पोलीस तैनात असतील. सुरक्षेच्या दृष्टीने यंदा १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे शहरभर लावण्यात आले आहेत, तर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी आणि मिरवणुकींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. पोलिसांच्या पेट्रोलिंग गाड्या सातत्याने गस्त घालतील आणि नियंत्रण कक्ष (Control Room) सतत कार्यरत राहील. विशेष म्हणजे, पोलिसांनी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दीचे व्यवस्थापन आणि संशयास्पद हालचाली ओळखण्याची तयारी केली आहे. नागरिकांनी विसर्जनावेळी पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



सह पोलीस (आयुक्त कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी काय म्हणाले?


सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंदोबस्ताबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित झाल्याने मुंबई पोलिसांनी महापालिकेसोबत मिळून अभूतपूर्व तयारी केली आहे. मुंबईत तब्बल ६,५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि अंदाजे दीड ते दोन लाख घरगुती गणपती आहेत. विसर्जनासाठी ६५ नैसर्गिक ठिकाणे आणि २०५ कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीचे मार्गही पूर्णपणे मोकळे करण्यात आले असून, वाहतूक सुरळीत रहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये १२ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० डीसीपी, ६१ एसीपी, ३,००० अधिकारी आणि तब्बल १८,००० पोलीस कर्मचारी सामील असतील. याशिवाय SRPF च्या १४ तुकड्या, क्विक रिस्पॉन्स फोर्सच्या ४ तुकड्या, दंगल नियंत्रण पथकाच्या ३ तुकड्या तसेच BDDS (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड) सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईत १०,००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार असून, प्रथमच AI तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. मात्र, परवानगीशिवाय कोणालाही ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय वेशांतर केलेले गुप्त पोलिसही तैनात केले जातील. दहशतवादविरोधी उपाययोजनाही राबवण्यात आल्या असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.



सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे काय म्हणाले?


गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी विशेष नियोजन केले आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू या प्रमुख विसर्जन स्थळांवरील रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुका आणि वाढलेली गर्दी सुरळीत पार पडावी यासाठी ४ पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली तब्बल २८२६ वाहतूक पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान रस्त्यावर तैनात राहणार आहेत. यावेळी सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेतले जाणार असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील १२ धोकादायक पुलांबाबत नागरिकांना विशेष सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दी नियंत्रणासाठी ५२ ठिकाणे संवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी विशेष कंट्रोल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच समुद्रकिनारी सुरक्षेसाठी ५२० सुरक्षा रक्षक तैनात असून, कोस्टगार्ड दलाची मदतही मुंबई पोलिसांना मिळणार आहे.

Comments
Add Comment

अरुण गवळीमुळे बदलणार दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे!

मुंबई : एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी

‘त्या’जाहिरातीनंतर वाद; यामागे 'गजवा-ए-हिंद' : भाजपचा आरोप

हलाल लाइफस्टाइल टाऊनशिपची जाहिरात विकासकाने हटवली नेरळ : नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल

नवी मुंबईत सिडकोकडून २२ हजार घरांची जम्बो लॉटरी

मुंबई : म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर

Maratha Reservation: मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मराठा आंदोलनात ट्विस्ट मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha-OBC Reservation)

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, मुंबई पोलिसांनी धाडली लूकआउट नोटीस

मुंबई: मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या